
NCP Sharad Pawar opinion in MVA after Raj and Uddhav Thackeray alliance
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी माणसांच्या मुद्द्यांवर एकत्र आले आहेत. यापूर्वी मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी त्यांची युती निवडणुकीमध्ये देखील कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि.24) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर झाली आहे. दोन्ही भावांनी एकत्र येत मुंबईतील मराठी माणसांसाठी युती करत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षातील जागावाटप हे समोर आलेले नाही. मात्र ठाकरे बंधूंची ही युती मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे या पालिकांसाठी असणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी मागील अनेक महिन्यांपासून राज ठाकरे यांच्यासोबत बोलणी सुरु केली होती. दोन्ही भावांच्या हिंदी भाषा विरोधी झालेल्या सभेला देखील कॉंग्रेस नेत्यांची उपस्थित नव्हती. यानंतर देखील अनेकदा कॉंग्रेसने आपला विरोध व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत युती जाहीर करताना कॉंग्रेसने आपला मार्ग वेगळा केला. यापूर्वीच मुंबईमध्ये कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे मुंबईमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पूर्णपणे तुटली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल. ठाकरे बंधू एकत्र लढायचं ठरवलं आणि कुणाला घ्यायच नाही असं ठरवलं तर आम्ही आणि काँग्रेस एकत्र लढू. आम्हाला ठाकरे न्याय देत नसतील आम्ही निर्णय घेऊ, असेही रोहित पवारांनी यावेळी सांगितलंय. ठाकरे बंधू केवळ आम्हाला 15 जागा द्यायला इच्छुक आहेत. त्यातील बहुतांश जागा पडणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी जे जिंकणारे उमेदवार आहेत त्यांना संधी द्यायला हवी. त्यांनी हट्ट करून उपयोग नाही, अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल असेही रोहित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता मुंबईमध्ये शरद पवार काय भाकरी फिरवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.