Nitesh Rane's decision to issue Malhar Jhata certificate for Hindus against halal mutton
मुंबई : राज्यामध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रातील गुंतवणूक आणि उत्पन्न यावर चर्चा सुरु आहे. मात्र भाजप मंत्र्यांनी अजब घोषणा केली आहे. यामुळे राज्यामध्ये नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘हलाल’विरोधात ‘झटका’ मांस असा वाद सुरू झाला आहे. हिंदूंसाठी खास मटणाची दुकाने उघडणार असून यामध्ये मटण विकणारे देखील हिंदू असणार आहे.
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटणाच्या दुकानाबाबत एक घोषणा केली. हिंदू लोकांसाठी वेगळी मटणाची दुकाने असणार असून यासाठी वेगळी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. मंत्री नितेश राणे म्हणाले की, “आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. येथे केवळ झटका मांसाची विक्री होईल. त्यासाठी आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली आहे. या मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी करता येईल. याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या दुकानांमध्ये १०० टक्के हिंदूंचं प्राबल्य दिसेल. मांस विक्री करणारी व्यक्ती हिंदू असेल.” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र या घोषणेमुळे आता राज्यामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील इतर नेत्यांनी यावरुन जोरदार टीका केली आहे. याबाबत एआयएमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “मला नितेश राणे यांना विचारायचं आहे की तुम्हाला मटण, कबाब, बिर्याणी हे सगळं खायचं आहे. मग तरी देखील मटणाच्या या भानगडीत कशाला पडताय? कशाला मटणाच्या मागे लागलेले आहात? आम्हाला मटण खाऊ द्या आणि तुम्ही देखील खा. तुम्हाला काही प्रमाणपत्र द्यायचंच असेल तर द्या.” असे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “तुम्ही जय महाराष्ट्र, जय हिंद, जय मल्हार या नावांची मटणाची दुकान मोठ्या प्रमाणात पाहिली आहेत का? मी जय मल्हार नावाची दोन-तीन दुकानं अलिकडेच पाहिली आहेत. परंतु, आपण मटण कोणाकडून घ्यायचं हे जर मंत्री सांगणार असतील तर ते मंत्री धन्य आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.