(Photo - Social Media)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांनी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची चर्चा असून, ही बैठक तब्बल सहा तास चालल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीनंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवण्याबाबत प्रशांत किशोर यांनी सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रदेशाध्यक्ष कोणाच्या सल्ल्याने बदलला जात नाही, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा मुद्दा हा पूर्णपणे पक्षांतर्गत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आपल्याला अजिबात वाटत नसल्याचे अनिल पाटील यांनी म्हटले. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांमध्ये अंतिम भूमिका राष्ट्रीय अध्यक्षांची असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांमध्ये आपल्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू असल्याबाबतही अनिल पाटील यांनी भाष्य केले. माध्यमांना ज्या पद्धतीने सूत्रांकडून माहिती मिळते, त्याचप्रमाणे आपलीही काही सूत्रे असल्याचे सांगत त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षात कुठेही चर्चा झाल्याचे आपल्याला जाणवत नसल्याचे स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष होण्यापेक्षा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्ये आपल्याला अधिक आनंद असल्याचे पाटील यांनी सांगितले. पक्षाने भविष्यातही कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत विविध राजकीय तर्क-वितर्क सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीबाबतही चर्चा रंगल्या आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे अनिल पाटील यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या बैठकीनंतर सुरू झालेल्या या चर्चांना प्रत्यक्षात पक्षाच्या पातळीवर किती महत्त्व दिले जाते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.






