(फोटो सौजन्य-AI एआय)
मंगळवारी, सायंकाळी ४.३० ते ६.३० या – वेळेत ही परीक्षा नियोजित होती. परीक्षा – सुरू करण्यापूर्वी परीक्षार्थीची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करण्यात येत होती. मात्र, याचदरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुमारे निम्म्या परीक्षार्थीचे बायोमेट्रिक पूर्ण झाले, तर उर्वरित परीक्षार्थीना लॉगिन करता आले नाही. दरम्यान, ज्यांचे लॉगिन झाले त्यांनी ऑनलाइन प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात केली.
काही परीक्षार्थीनी पाच ते सहा प्रश्न सोडविल्यानंतर सायंकाळी सुमारे ५.५० वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर तब्बल ६.०५ वाजण्याच्या सुमारास वीज आली. परीक्षा केंद्रावर वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर केंद्र चालकांनी परीक्षा पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षार्थीनी त्यास तीव्र विरोध केला.
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
वीज खंडित झाल्यामुळे परीक्षा प्रक्रियेत मोठा व्यत्यय आला असून, अनेक परीक्षार्थीना निर्धारित वेळेत परीक्षा देता आली नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली. विशेषतः दूरवरून आलेल्या परीक्षार्थीमध्ये मोठी नाराजी होती. यामध्ये युवतींचीही संख्या होती. परीक्षा लांबल्याने त्यांना परतीच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. केंद्र संचालकांनी परीक्षा नंतर घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी लावून धरली. मात्र, यावर तातडीने तोडगा न निघाल्याने परीक्षा केंद्र परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
स्पर्धा परीक्षांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह शासकीय स्पर्धा परीक्षांच्या आयोजनात वारंवार तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे अडथळे निर्माण होत असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही याच परीक्षा केंद्रावर एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील नियोजन, तांत्रिक व्यवस्था आणि पर्यायी विद्युत व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उशिरापर्यंत परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार, याबाबत परीक्षार्थीना स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने त्यांची अस्वस्थता कायम होती.






