Ganesh Bidkar's allegation against Ravindra Dhangekar's wife
पुणे : पुण्यातील कॉंग्रेस पक्षाचे नेते व पुन्हा एकदा उमेदवारी मिळवलेले रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीवर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. प्रतिभा धंगेकर यांच्यावर वक्फ बोर्डाची मालमत्ता हडपल्याचा गंभीर आरोप भाजप नेते गणेश बीडकर यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील महत्त्वपूर्ण अशा लक्ष्मी रोडवर ही मालमत्ता असून ती हडपल्याचा गंभीर आरोप भाजप नेते बीडकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुण्यातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
डॉ. महंमदखान करीमखान व त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी 1935 साली लक्ष्मी रस्त्यावरील 17 हजार 300 फूट क्षेत्रफळ असलेली सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकत्याच दिलेल्या निकालात ही मालमत्ता ‘वक्फ’ बोर्डाची असल्याचे घोषित केल्यानंतर याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने तातडीने स्थगिती दिली आहे. लक्ष्मी रस्त्यावर हामजेखान चौकात असलेला हा 17 हजार चौरस फुटाच्या भूखंडाची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक आहे. याठिकाणी होणारी उलाढाल ही करोडो रुपयांमध्ये असल्याने या भूखंडावर डोळा ठेवून तो लाटण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बीडकर यांनी केला आहे.
यावेळी गणेश बीडकर म्हणाले, “डॉ. महंमदखान करीमखान यांनी ही मालमत्ता वक्फला देताना या मालमत्तेचा कशासाठी वापर करण्यात यावा, हे आपल्या वक्फनाम्यात स्पष्ट केले होते. या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न मशिदीसाठी, गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दफनविधी, गरिबांचे लग्नकार्य आदी समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करावे, असा विचार डॉ. महमंदखान करीमखान यांनी 1936 साली वक्फनाम्यात मांडला होता. मात्र, त्यांच्या पश्चात ही जमीन वक्फ न होता तिचा गैरवापर सुरू होता. या प्रकरणी रसुल अन्सर चित्तारी व त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु यांनी वक्फ मंडळाकडे पाठपुरावा सुरू केल्यानंतर हा गैरप्रकार लक्षात आला आहे”
पुढे ते म्हणाले, “या जमिनीचा सध्याचा ताबा हा आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह सहकारी व्यक्तींकडे आहे. गेली अनेक वर्षे याप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षानंतर 7 ऑक्टोबर रोजी वक्फ मंडळाने हा भूखंड वक्फ असल्याचे घोषित केले. त्यामुळे मुस्लिम समाजाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी चित्तारी यांनी अनेक वर्ष न्यायालयीन लढा दिला. ही जागा वक्फ असल्याचे धंगेकर यांना माहिती असतानाही त्यांनी या जागेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू ठेवला होता. त्याला वक्फ मंडळाच्या आदेशाने लगाम लागला आहे. आमदार धंगेकर हे अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या पत्नीच्या नावे हा भूखंड असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत वक्फ असलेली मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी लाटून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले असल्याचा” आरोप पत्रकार परिषदेत केला.
हे देखील वाचा : राजकारणातील सर्व पुतण्यांचा DNA सारखाच…; घरातील बंडानंतर छगन भुजबळांचा रोख कोणाकडे?
“एका लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक वापरासाठी, गोरगरिबांसाठी दान केलेल्या (वक्फ) जागेचा स्वतःच्या हितासाठी तिचा वापर करणे हे दुर्दैवी आहे. याप्रकरणी वक्फ मंडळाकडे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रविंद्र धंगेकर व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि लवकरात लवकर ताबा घेण्यात यावा. तसेच जिल्हा भूमिअभिलेख / नगर भुमापन क्र. २ येथे अर्ज करून प्रॉपर्टीकार्डवरून नाव कमी करून वक्फ बोर्डाचे नाव त्वरित करण्यात यावी असा अर्ज वक्फ बोर्डकडे करण्यात आला आहे,” अशी मागणी गणेश बीडकर यांनी केली आहे.