Reaction of Sharad Pawar group MP Nilesh Lanke on the demolition of Aurangzeb's tomb
पुणे : राज्यामध्ये औरंगजेबाची कबर यावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी केली जात आहे. संपूर्ण राज्यभरातून ही मागणी केली जात आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणावर आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच औरंगजेब हा राष्ट्रपुरूष होता काय? असा सवाल निलेश लंके यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले निलेश लंके?
निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सरकारच परिवर्तन झाल्यापासून अहिल्यानगरच्या सुपा एमआयडीसीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या यंत्रणेचा वापर करून व्यावसायिकांना त्रास द्यायला सुरुवात केली असल्याचा आरोप नाव न घेता निलेश लंके यांनी केला आहे. महसूल मंत्री असताना अधिकाऱ्यांमार्फत बैठका लावून व्यावसायिकांना दंड कसा होईल अशा सूचना दिल्या गेल्या. नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह सुपा एमआयडीसीतील व्यवसायिकांची बैठक लावण्यात आली. आणि चुकीच्या पद्धतीने तिथल्या लेबर कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आले असा गंभीर आरोप निलेश लंके यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे निलेश लंके यांनी विखे पाटील कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “सुपा एमआयडीसीमध्ये मी गुंडागिरी करतो असे माझ्यावर विखे कुटुंब आरोप करत आहे. पण या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त. सुपा एमआयडीसी सारखं वातावरण कुठल्याच एमआयडीसीमध्ये नाही. तुमच्या परिसरात तुम्हाला एकही उद्योग आणता आला नाही आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता? असा सवाल त्यांनी विखे यांना विचारला. जर तुम्ही आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करतच असाल तर आम्ही देखील दोन हात करायला तयार आहोत…तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा,” अशा शब्दांत खासदार लंकेंनी विखे पाटील यांना आव्हान दिले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार निलेश लंके यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत देखील वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो त्या राजांसाठी काहीतरी केले पाहिजे, यात राजकारण नसून प्रत्येक रविवारी गडकिल्ल्याची साफ सफाई करायची आहे…येत्या रविवारी म्हणजेच 16 तारखेला शिवनेरी गडावरून या मोहिमेला सुरुवात करणार आहे तर गड किल्ल्याचे संवर्धन करण्यात सरकार कमी पडत आहे. औरंगजेबाची कबर काढण्याच्या विषयाला सामाजिक रूप न देता त्याची कबर काढावी अशी आमच्या सर्वांची भूमिका आहे. औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होता काय? किंवा समाजसेवक नव्हता,” असे स्पष्ट मत निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये औरंगजेबाची कबर काढण्यावरुन राजकारण रंगले आहे.