Rohit Pawar demands Agriculture Minister Manikrao Kokate resignation for jungle rummy in the Legislative Assembly
पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव चर्चेत आले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळामध्ये गेम खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला. सभागृहामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रम्मी खेळत होते. याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच गदारोळ निर्माण झाला. युटुबची व्हिडिओ लावताना ते गेम सुरु झाल्याचे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा जुगार खेळणारा सत्ताधाऱ्यांसाठी ‘माणिक’ असला तरी तो शेतकऱ्यांच्या गळ्यात अडकवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यावा… आणि रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी खातं संवेदनशील मंत्र्याकडं द्यावं,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “तसंच शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव हे सरकार कायमच आणतं, पण खरंच कळवळा असेल तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, भावांतर योजना, पीक विम्याचे जुने ट्रिगर पुन्हा लागू करण्याची आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता देण्याची #हीच_योग्य_वेळ_आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा उद्रेक झाला तर त्यात हे मग्रूर सरकार भाजून निघाल्याशिवाय राहणार नाही..! याशिवाय गेल्या काही महिन्यांत विविध भानगडीत अडकलेल्या, नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत असलेल्या आणि असंवेदनशीलपणे गरळ ओकणाऱ्या सर्वच मंत्र्यांच्या हाती सरकारने सरळसरळ नारळ द्यावा!” अशा शब्दांत रोहित पवार यांनी शेतकऱ्यांबाबत अनेकदा वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
#राजीनामा #राजीनामा #राजीनामा#शेतकऱ्यांची_माफी #माफी #माफी लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा जुगार खेळणारा सत्ताधाऱ्यांसाठी ‘माणिक’ असला तरी तो शेतकऱ्यांच्या गळ्यात अडकवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यावा… आणि रात्रंदिवस मातीत… — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 21, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात छावा संघटनेने निवेदन दिले. मात्र हे निवेदन देताना त्यांनी पत्ते फेकले. यामुळे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी तातडीने सूरज चव्हाण यांच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार हेच निर्णय घेतील असे मत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.