RSP leader Mahadev Jankar advised Chhagan Bhujbal to form a new party and alliance
सातारा : विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत. छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली नाही. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. मात्र त्यानंतर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भुजबळांच्या नाराजीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता छगन भुजबळ यांनी नवीन पक्ष काढावा अशी मागणी केली जात आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. तसेच त्यांची मंत्रिपदाची संधी ही अजित पवार यांनी दिली नसल्याचे देखील अनेकदा त्यांच्या बोलण्यातून दिसून आले आहे. छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या गटात जाणार की देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये जाणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. यानंतर आता त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छगन भुजबळांना एक सल्ला दिला आहे. “छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा”, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाले महादेव जानकर?
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी एका माध्यम वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीवर प्रश्न विचारण्यात आला. यावर महादेव जानकर म्हणाले की, ओबीसींची अशीच अवस्था होणार आहे. ज्या समाजाचे दल आहे, त्या समाजाचे बळ आहे. अन्याय झाला म्हणून मी आता बोलू शकणार नाही. कारण आपला पक्ष नाही. आपण याचिकाकर्ते आहोत. देणारे बनणारे असाल, तर आम्ही आमचं दल केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा, आम्ही तुमच्याबरोबर युती करु. त्यांनी जर हा निर्णय घेतला तर चांगलं होईल. आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिवशी त्यांनी ते करावं. त्यांनी तो निर्णय घेतला तर चांगलं होईल. आताच नाही पुढच्या पिढीचंही भलं होईल”, असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे महादेव जानकर म्हणाले की, “मागितल्याने भीक मिळते, हक्क मिळत नाही त्यामुळे मागण्यापेक्षा देणार झालं पाहिजे ओबीसीबाबत भाजप आणि काँग्रेसची पण नियत चांगली नाही. राज्यात एव्हीएम सेट करण्यात आला म्हणून यांची थंपिंग मेजोरिटी आली. आमची मतही भाजपला वळवण्यात आली आहेत. बलेट पेपरवर निवडणूक घ्या, आमचं जे होईल ते होईल. ईव्हीएम लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष हा दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. आम्ही आता एनडीएतून बाहेर आहोत”, असे स्पष्ट मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत बातम्या वाचा
देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये सहभाग घेतला होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घेतलेली भेट आणि देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली गळाभेट चर्चाचा विषय ठरली होती. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर हे महायुतीमधून बाहेर पडले. महायुतीबाबत त्यांनी अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. महादेव जानकर यांनी छगन भुजबळ यांना ऑफर दिल्यानंतर त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी महादेव जानकर यांच्या समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा या वक्तव्यावर छगन भुजबळांनी ठीक आहे एवढीच प्रतिक्रिया दिली आहे.