बिहार विधानससभा निवडणूक दोन टप्प्यात होणार
एनडीए विरुद्ध विरोधी पक्षांमध्ये लढत
14 नोव्हेंबरला जाहीर होणार निकाल
बिहार विधानसभेची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपप्राणित एनडीए आणि अन्य विरोधी पक्ष अशी ही लढत होणार आहे. दरम्यान बिहारमध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मैदानात उतरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बिहारमध्ये ऑपरेशन त्रिशूळ राबवत असल्याचे समोर आले आहे. तसेच एनडीएचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार यासाठी संघाची भूमिका महत्वाचा समजली जात आहे,
बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार का हे पहावे लागणार आहे. कारण भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या असल्या तरी नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले होते.
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली यांच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. दरम्यान या तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवताना राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाची भूमिका महत्वाची ठरली आहे. महाराष्ट्रात महायुती जिंकल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून संघाने देखील मान्यता दिल्याचे समोर आले होते. दरम्यान यंदा एनडीए जिंकल्यास नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
आता यंदा बिहारमध्ये एनडीएचा विजय झाल्यास बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळणार का? हे पहावे लागेल. यामध्ये संघ कोणाच्या नावाला मान्यता देतो हे देखील पहावे लागेल. भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्यास संघाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. तसेच संघ आता मैदानात उतरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात संघ शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याचा फायदा भाजपला होतो हे आपल्याला आधीच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलेच आहे. यंदा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्यास आपला मुख्यमंत्री करणार की नितीश कुमार यांना संधी देणार हे पहावे लागणार आहे.
ऑपरेशन त्रिशूळ
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजयी करण्यासाठी संघ मैदानात उतरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृसंस्था समजली जाते. बिहारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘ऑपरेशन त्रिशूळ’च्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणार आहे. संघाचे स्वयंसेवक तळागाळामध्ये जाऊन काम करणार आहेत. ज्या-ज्या वेळेस संघ मैदानात उतरला आहे, तेव्हा भाजपला मोठा विजय मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.
बिहारमध्ये भाजपच्या कामावर किंवा कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या मतदारांची यादी तयार केली जात आहे. अशा मतदारांपर्यंत संघाचे स्वयंसेवक संपर्क साधणार आहेत. संघ निवडणूक केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता राष्ट्रनिर्माणासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान बिहारमध्ये यंदाची निवडणूक कठीण असल्याचे समोर आले आहे.