Rupali Chakankar reaction to actress Prajakta Mali complaint to the State Women Commission
पुणे : राज्यामध्ये सध्या परभणी प्रकरण आणि बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामुळे मागील 19 दिवसांपासून बीडमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अद्याप आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे बीडसह राज्यभरातून रोष व्यक्त केला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी माध्यमांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाने कोणती तक्रार केली आहे का यासंदर्भात प्रश्न केला. यावर रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अद्याप महिला आयोगाकडे तक्रार केलेली नाही. प्राजक्ता माळी यांनी अद्याप आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. प्राजक्ता माळी यांनी, जर आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाणार” असे स्पष्ट मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचे हत्येचा मास्टरमाईंड आरोपी म्हणून नाव समोर येत आहे. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये निकटचे संबंध असल्यामुळे कारवाईला दिरंगाई केली जात असल्याची टीका केली जात आहे. यावरुन अजित पवार यांच्यावर देखील विरोधकांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “बीडच्या घटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सखोल चौकशी करणार. विरोधकांचे काम आहे, आरोप करणं त्यासंदर्भात मी काय बोलणार? राजगुरुनगरमधील घटनेतील पीडित कुटुंबीयांना जी मदत अपेक्षित आहे, ती मदत केली जाणार. राजगुरुनगर घटनेतील आरोपीला फाशी देण्यासंदर्भात आयोगाकडून प्रयत्न केले जाणार आहे” असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार सुरेश धस म्हणाले होते की, परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप केलं जातं. वाल्मिकी कराडला या इव्हेंट मॅनजमेंटची मोठी हौस आहे. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा, असा उपरोधिक टोला सुरेश धस यांनी लगावला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते.