धनंजय मुंडे व प्राजक्ता माळी यांच्या नात्याचे नाव घेतल्यामुळे मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : सध्या बीड हत्या प्रकरण जोरदार तापले आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मिक कराड याला अटक होत नसल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुढे आले असून त्यायोगे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे देखील नाव समोर येत आहे. सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच प्राजक्ता माळी ही परळीला सतत येत असल्याचा गंभीर आरोप देखील केले आहेत. यामुळे आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या बचावासाठी मनसे पक्ष सरसावला आहे.
आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधाना यांचं नाव घेतलं होतं. यामुळे प्राजक्ता माळी ही महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावर आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप गंभीर आणि मानहानी स्वरुपाचे आहेत. यामुळे मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन भाजप नेते व आमदार सुरेश धस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास जाणून घ्या एका क्लिकवर
मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करुन सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत. अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत,” अशी भूमिका मनसे नेते अमेय खोपकर यांनी घेतली आहे.
सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2024
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा खून?
सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार गटाचे आमदार व बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र आता त्यांनी सिनेविश्वातील अभिनेत्रींची नावे घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार सुरेश धस म्हणाले होते की, परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप केलं जातं. वाल्मिकी कराडला या इव्हेंट मॅनजमेंटची मोठी हौस आहे. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा, असा उपरोधिक टोला सुरेश धस यांनी लगावला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते.