संग्रहित फोटो
बीड : राज्यात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन वातावरण तापलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी झडताना दिसत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला असून, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा मुख्य सुत्रधार अटक करावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येत कराड यांचं नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे देखील अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे.
धनंजय मुंडेंची राजीनाम्याबद्दल त्यांनी एक सूचक विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. महाजनांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, असा अंदाज लावला जातोय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंबाबत महायुती सरकार नेमका काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा मुद्दा देशभरात गाजताना दिसत आहेत.
वाल्मिक कराड कोण आहे?
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे कराड जिल्हा चालवायचा. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना दरारा होता. विशेष म्हणजे, यापूर्वीही वाल्मिक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कराड याचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे. आता केज पोलीस ठाण्यात कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.