
Sambhaji Chhatrapati reaction on walmik karad surrender in beed Santosh deshmukh murder case
कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी हा प्रकार घडल्यानंतर अद्याप पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. या प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला आहे. स्वतः पाषाण रोड ऑफिसला येऊन त्याने आत्मसमर्पण केल्यामुळे विरोधकांनी मात्र संशय व्यक्त केला आहे. यावर आता स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे.
वाल्मिकी कराड याने व्हिडिओ शेअर करुन नंतर स्वतः कारमध्ये येऊन आत्मसमर्पण केले. मात्र ही शरणागती नसून पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करत असल्याचा आरोप विरोधकांनी केले आहे. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला, हे सीआयडीचं यश नसून, आम्ही सरकारवर जो दबाव टाकला त्यातून वाल्मिकी कराडवर मानसिक दबाव आला आणि तो शरण आला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक आरोप केले आहेत. “22 दिवस वाल्मिकी कराड हा महाराष्ट्रात बिनधास्तपणे फिरत होता. त्याने अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतलं. तो पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाला. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मिकी कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे. वाल्मिकी कराड हा 7 आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने 14 गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा तो बॉडीगार्ड घेऊन फिरतो. कराडवर मोक्का लागणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी आता वाल्मिकी कराड याच्यावर मोक्का लावणार की नाही याबद्दल स्पष्टीकरण द्यावं. वाल्मिकी कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही,” अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे त्यांनी आणखी एक मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद देऊ नये. कुणीही पालकमंत्री पद घ्यावं पण देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये, मुख्यमंत्र्यानी पालकमंत्री पद स्वीकारलं तर आम्ही स्वागतच करू, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही आणि देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही, मोठं मन करून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदा ही का बोलला नाहीत?” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.