सुषमा अंधारे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची वाल्मिक कराड आत्मसमर्पणावर प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपरहण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये 20 दिवसांनंतर मास्टरमाईंड वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केले आहे. पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी ऑफिसमध्ये येऊन वाल्मिक कराड याने अचानकपणे सरेंडर केले. त्यापूर्वी त्याने व्हिडिओ देखील जारी केला असून यामध्ये हत्येचे आरोप फेटाळण्यात आले आहे. वाल्मिक कराड याचे सरेंडरवर महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून रोष व्यक्त केले आहे.
पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराड हा समर्पण करणार असल्यामुळे सकाळपासून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. वाल्मिक कराड हा दोन नगरसेवकांसह सीआयडी ऑफिसमध्ये स्वतःहून गाडीमध्ये आला. आणि सीआयडी ऑफिसरने त्याला ताब्यात घेतले. मात्र हे आत्मसमर्पण पूर्णपणे ठरवून केले असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “परभणी आणि बीड या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत समाजाला काळिमा फासणाऱ्या आहेत. या कुटुंबांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी सरकारचीही आहे आणि आम्हीही ती घेतली आहे. मला शरण वगैरे शब्द योग्य वाटत नाही. अटक झाली असती तर मनाला थोडंसं समाधान वाटलं असतं. माझी अपेक्षा होती की सरकारनं त्यांना अटक करायला हवी होती. शरण काय म्हणताय? एका माणसाची हत्या झाली आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीचे अश्रू आयुष्यात कुणीच विसरणार नाही” अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पोलीस यंत्रणा त्यांना शोधतच होती. एक माणूस व्हिडीओ व्हायरल करतो. पण तो आपल्याला सापडत नाही. हे फार धक्कादायक आणि वेदना देणारं आहे. माझा महाराष्ट्रातल्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीची हिंमत कशी होऊ शकते? ज्याच्याबद्दल गेल्या अनेक आठवड्यांपासून सगळीकडे एवढा रोष आहे, तो एक व्हिडीओ काढतो. तो पोस्ट करतो आणि तरी त्याला अटक होत नाही. यावर गृहमंत्रालयाचं काय निवेदन येतं याची वाट बघूयात. पोलिसांना कसं कळलं नाही की हे कुठे होते? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संशय व्यक्त करुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “शरण येणं किंवा आत्मसमर्पण करणे हा शब्दप्रयोग प्रसारमाध्यमे वापरत आहेत. या कृतीला आत्मसमर्पण हा शब्दप्रयोग होत असेल तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणार आहे. कारण ज्या प्रकरणाने अधिवेशन गाजवलं होतं, असंख्य आमदारांनी यावर भाष्य केलं होतं. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ही त्यावर भाष्य केलं. तसेच लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यानंतर चौकशी संदर्भात उपायोजना केल्याचं सांगण्यात आले. त्या घटनेचा कुणालाही माघमुस लागला नाही. मात्र शरण येणार आहेत याचे मेसेज सर्वत्र प्रसारित झाले. म्हणजे पोलीस सोडून सर्वांना सगळं काही माहिती होतं,” असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.