Sanjay Nirupam alleges that Aditya Thackeray has a drug habit
मुंबई : राज्यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन राजकारण तापले आहे. मागील आठवड्यामध्ये दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते. दिशा सालियान हिचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र तिची आत्महत्या नसून तिची हत्या झाली होती. तसेच त्यापूर्वी तिच्या सामूहिक लैंगिक अत्याचार झाला असल्याचा गंभीर दावा दिशा सालियान हिच्या वडिलांनी केला होता. सतीश सालियान यांनी मुंबई हाय कोर्टामध्ये या संदर्भात याचिका देखील दाखल केली होती. या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी देखील पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान प्रकरणावरुन निशाणा साधला. ते म्हणाले की, “दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यांनी मोठी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी एक नंबरचा जो आरोपी ते आदित्य ठाकरे आहेत. एक दोन दिवसांत त्याबाबत एफआयआर होईल. यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मोरिया आणि इतर काहींवर संशय आहे. 8 जून 2020 ला दिशा सालियान हिचा मृत्यू झाला होता. 20 वर्षीय महत्त्वकांशी मुलीचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. सुशांत सिंग राजपूत यांची ती मॅनेजरी होती. त्यावेळी आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे मंत्री होते. त्यांचे वडील राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याचवेळी यांच्या मृत्यूमध्ये या व्यक्तीची काहीतरी भूमिका असल्याचा संशय आला होता,” असा मोठा दावा संजय निरुपम यांनी केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “8 जूनच्या रात्री दिशा सालियानच्या घरी एक पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये हे सगळे तिथे उपस्थित होते. पण त्यावेळी मालवणी पोलीस स्टेशनमधून ज्या प्रकारचा तपास होण्याची अपेक्षा होती तो झाला नाही. त्यानंतर आता हा विषय सुरु आहे. “राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली असून त्याकडून चौकशी सुरु आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवस उशीराने प्राप्त झाला. तिचा मृतदेह हा इमारतीपासून २५ फूट लांब आढळून आला. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या आणि नग्नावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असून त्याची नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,” असे मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र हे प्रकरण अजून सीबीआयकडे गेलेले नाही. मुंबई पोलिसांनीच याची चौकशी केली आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये एक मोठं षडयंत्र दिसून येतं. यामध्ये ड्रग्जचं प्रकरण आहे. समीर खान म्हणून एक व्यक्तीला अटक करण्यात आली होती. ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरेला ड्रग्जची सवय आहे आणि ते हायड्रो पॉनिक व्ही नामक ड्रग्जचे सेवन करतात. असे समीर खानने चौकशीत म्हटले होते,” असा गंभीर दावा संजय निरुपम यांनी केला आहे.