मनसेच्या गुढीपाडव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो!
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025 in Marathi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. याच तयारी दरम्यान शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या एका बॅनरवर ठाकरेंच्या चार पिढ्या पाहायला मिळाल्या. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो बॅनरवर आहेत. अनेक वर्षांनी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नव्हता.मात्र यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो पाहायला मिळाला. या बॅनरनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की काय? अशी चर्चा देखील रंगली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी कोणत्याही बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले नव्हते. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी, “माझा फोटो वापरायचा नाही”, असं राज ठाकरे यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर ते आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत राज्य सरकारकडून समावेश करण्यात आला. त्यामुळं त्यांचा फोटो कुणालाही वापरता येवू शकतो, असा युक्तीवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच केला होता. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतरपासून सातत्याने बाळासाहेबांचा फोटो वापरत आले आहेत. एकनाथ शिंदेंसहीत त्यांचा पक्ष बाळासाहेबांचा फोटोचा वापर करतात. आता बाळासाहेबांचा फोटो वापरणाऱ्या पक्षांमध्ये आता मनसेचीही भर पडली. त्यामुळे आता तीन पक्ष बाळासाहेबांचे फोटो वापरू लागले आहेत.
मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी या बॅनरवरुन स्पष्टीकरण दिले की, “ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्याभरात त्याने हे बॅनर्स लावले असून हे बॅनर्स लवकरात लवकर काढण्यात येतील,” असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे. तसेच “सध्या या बॅनर्सची फक्त मिडियामध्ये चर्चा सुरू आहे. “ज्या तरुण कार्यकर्त्याने ही बॅनर लावले त्याच्याशी मी बोललो. संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांनी देखील त्याच्याशी संवाद साधला आहे. हे बॅनर काढले जातील,” असं किल्लेदार यांनी स्पष्ट केलं आहे. मुनाफ ठाकूर नावाच्या कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) गुढी पाडवा मेळाव्याला प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. हा मेळावा ३० मार्च रोजी दादर येथील शिवाजी महाराज मैदानावर आयोजित केली जाणार आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे राज्यभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करतील. शिवाजी पार्कवर आयोजित सभेला मोठ्या संख्येने मनसे समर्थक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा राज्याच्या राजकारणात कोणते नवे वळण आणणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिका निवडणुका लक्षात घेता, हा मेळावा मनसेसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते. या कार्यक्रमाद्वारे पक्ष आपली विचारसरणी प्रभावीपणे मांडू शकतो आणि लोकांमध्ये आपली पकड मजबूत करू शकतो.