
शरद पवारांचे राजकारण विश्वासघातकी; गोपीचंद पडळकर यांची टीका
अकलूज : शरद पवार हे विश्वास घातकी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे संपूर्ण राजकारण विश्वासघातांवर आधारलेले आहे. पवारांना जर ईव्हीएमबद्दल एवढेच वाईट वाटत असेल तर त्यांनी सर्वात अगोदर राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे राजीनामे घ्यावेत. मग ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु करावे, अशी घेणाघती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडी येथे केली.
मारकडवाडी येथे शरद पवार, जयंत पाटील यांची सभा झाल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांची सभा माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केली होती. या सभेला ब्रम्हाणंद पडळकर, आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब वावरे, बाजीराव काटकर, आजय देशमुख यांच्यासह संपूर्ण माळशिरस तालुक्यातून लोक हजर होते.
पडळकर म्हणाले, शरद पवारांनी फार पुढचा विचार करून मारकडवाडीतून आंदोलनाला हवा दिली आहे. मारकडवाडी हे गाव धनगर बहुल गाव आहे. धनगर व इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा खेळ सुरु आहे. पण हा देश संविधानवर चालतो. शरद पवार व राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून चालत नाही. शरद पवार हे संविधानाला मानत असते तर त्यांनी ईव्हीएमचा विरोध केला नसता.
सदाभाऊ खोत म्हणाले, मतदान बूथ कब्जात घेऊन धादली करून निवडून येण्यासाठी यांना बॅलेट पेपरवर निवडणुका हव्या आहेत. कालच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस नावाच्या वस्तादाने बारामतीच्या शरद नावाच्या पेलवानाला चारिमुंड्या चित करत पवारांची राजकीय कारकीर्द धुळीला मिळवली आहे. गांधी आणि पवारांनी इतकी वर्षे लोकशाहीला वेटबिगारी व गुलाम बनवून ठेवले होते. आता यांच्या हातात सत्ता नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या भाषणात मोहिते पाटील यांच्यावर कडाडून टीका करताना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आणि आपल्या आमदारकीच्या काळात आपण मारकडवाडीमध्ये केलेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवली.
100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले
100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले. यांचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही, १०० गावं आहेत या विधानसभा मतदारसंघात पण हेच गाव का निवडले , कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.
…तर राजकारणातून थांबेन
माळशिरस तालुक्यात आता परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे. सन 2029 साली जर मी माळशिरस तालुक्यातून निवडून आलो नाही तर मी राजकारणातून थांबेन, अशी जाहीर घोषणा राम सातपुते यांनी केली.
माझा आमदार निधी मारकडवाडीला
आमदार सदाभाऊ खोत यांनी माझा पहिला आमदार निधी मी मारकडवाडीला देत असल्याचे सांगून भाजपला मतदान करन लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल मारकडवाडी ग्रामस्थांचे खोत यांनी आभार मानले.