shinde group leader ramdas kadam target uddhav thackeray over bmc elections 2025
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या पालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील आहेत. मुंबई राखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी दोन दशकांनंतर ठाकरे बंधू हे एकत्रित आले आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी हे सूचक संकेत मानले जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंसोबत युती करु पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्यांनी अनेक राजकी विषयांवर भाष्य केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत युती करण्याबाबत मत व्यक्त केले आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ठीक आहे, आता २० वर्षांनी एकत्र आलो आहोत. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असाही त्याचा भाग नाही. पण मी जे काही म्हटलं की मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी आणि मराठी आस्मितेसाठी जे-जे करण्याची गरज आहे, ते-ते करण्याची माझी तयारी आहे”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीबाबत केले. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमधील या उत्तराचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभे असल्याचे म्हणत गंभीर टीका केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले रामदास कदम?
रामदास कदम म्हणाले की, “एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतो आहे. हे काय बिहार आहे का? वाट्टेल ते पंतप्रधानांबाबत बोलायचं, गृहमंत्र्यांबाबत बोलायचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलायचं, नको नको ते शब्द एकनाथ शिंदेना वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावर साकडे घालायचं की मला वाचवा आणि मुलाला वाचवा, दिशा सालियन प्रकरणातून त्याला बाहेर काढा. उद्धवजी तुम्हाला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पितं, तसं नाही सगळ्यांना ते दिसतं. मला अनेक गोष्टी माहीत आहे. कशा पद्धतीने क्लिन चिट मिळाली ते माहिती आहे. मी न्यायालयावर काही बोलणार नाही. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपले आहे. आता आम्हाला भाजपासोबत घ्या आणि एकनाथ शिंदेना बाजूला करा मग मी येतो अशा अटी टाकल्या जात आहेत.” असा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “युतीबाबत राज ठाकरे अजून कुठे काय बोलले आहेत? राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. बाबा तू माझ्यासोबत ये सांगत आहेत. मुंबईत मराठी माणसं शिल्लक आहेत किती? मुंबईतल्या मराठी माणसाला संपवलं कुणी? विरार, नालासोपारा या ठिकाणी घालवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केली आहे. मराठी भाषेला देशाच्या पंतप्रधानांनी अभिजात दर्जा दिला त्यांच्याबाबत एक तरी चांगला शब्द बोला. महापालिका आपल्या घशात घालण्याचा एक कलमी कार्यक्रम चालला आहे याला मुंबईची जनता भीक घालणार नाही,” असं रामदास कदम यांनी म्हटले आहे. यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.