Shinde MP Naresh Maske makes controversial statement about Kashmir tourists Political News
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन दहशदवादी हल्ला करण्यात आला आहे. यामुळे काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाली असून अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. हल्ला झाल्यानंतर काल (दि.23) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये जाऊन अडकलेल्यांना दिलासा दिला आहे. तसेच दोन विमानांमधून 180हून अधिक पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र या परिस्थितीमध्ये देखील शिंदे गटाच्या खासदारांनी या अडकलेल्या पर्यटकांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र रेल्वेने गेलेल्या प्रवाशांना एकनाथ शिंदे यांनी विमानामध्ये बसवून परत आणले असे अपमानास्पद वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार नरेश मस्के यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याबाबत वक्तव्य केले. खासदार मस्के म्हणाले की, काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या लोकांमध्ये ४५ लोक वर्धा आणि नागपूरचे आहेत, जे तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली आहे, असे वक्तव्य खासदार नरेश मस्के यांनी केले.
त्यापुढे खासदार नरेश मस्के म्हणाले की, एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिका-यांना प्रोत्साहन मिळाले, काम करण्याची स्फूर्ती वाढली एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता ४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले, सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. त्यांच्या खाण्याचे वांधे होते त्या लोकांना एकनाथ शिंदेनी विमानतळावर आणलं, ते लोक पहिल्यांदा विमानात बसणार आहेत” असे देखील नरेश मस्के म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार नरेश मस्के यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी काश्मीरवारी केली. इथवर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले अशी भाषा करतात? महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जही बदारीचे भान सोडले आहे’ किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा.”असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.