shivsena mp arvind sawant target mahayuti government over mns protest
सिंधुदुर्ग : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यावरुन हा वाद सुरु झाला होता. यानंतर शासन निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर देखील यावरुन राजकारण तापले आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ठाकरे गट आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादानंतर या ध्ये ठिणगी पडली. यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी एकत्र मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे वाद चिघळला. या प्रकरणावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सिंधुदुर्गामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच मोर्चाला परवानगी न देणाऱ्या महायुती सरकारवर देखील निशाणा साधला आहे. अरविंद सावंत म्हणाले की, “मीरा-भाईंदरमधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंडासाठीचा मोर्चा आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाने मराठी माणसाचे उच्चाटन करायचा डाव मांडला आहे. पहाटे तीन-साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक केली म्हणजे ही तर आणीबाणी आहे,” अशी थेट टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भाजपने संविधान हत्या दिन साजरा केला. मात्र, भाजप रोज संविधानाची हत्या करते. राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाही ही संविधानाची हत्या की संविधानाचा सन्मान यांचं उत्तर द्यावं. लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक आहेत ही. पहलगाम विसरायचा हा त्यांचा मूळ अजेंडा आहे. मिडिया रोज या बातम्या दाखवत राहिल्यामुळे एक नेरेटीव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खासदार निशिकांत दुबे हे काल काय म्हणाले? महाराष्ट्रात काय आहे? आम्ही सुद्धा तेच म्हणतोय, महाराष्ट्रातून उद्योगधंदे गेले. सगळे उद्योग गुजरातला गेले. मात्र, झारखंडच्या खासदारांनी मराठी माणसाला तुमच्याकडे काय आहे हे विचारलं. आमच्या पैशावर जगता, हा माज भाजपच्या खासदाराला आला कुठून? चीड येत नाही मराठी माणसाला! भाजप ही लाचारांची फौज आहे,” अशा गंभीर शब्दांत अरविंद सावंत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरुन देखील राजकारण रंगले आहे. याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, ‘मराठी भाषेसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी कशाला हवी? मराठी भाषेला विरोध कारणासाठी सगळे एकवटतात. मात्र, आम्ही जातीपातीत विखुरलेले आहोत. भाजपच्या खासदाराने मराठी माणसावर टीका केली ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारा, मिंध्यांना विचारा! त्यांना हे लागलं की नाही लागलं” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.