ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : ठाणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी आणि बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ठाणे शहरातील काही तथाकथित शैक्षणिक संस्था व प्लेसमेंट एजन्सीची पोलिसांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त डुंबरे यांनी दिले आहे. ठाणे शहरातील राम मारुती रोडवरील सीईडीपी संस्थेकडून काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असल्याचा प्रकार घडला होता. तर ९ जून रोजी ठाणे रेल्वे स्टेशनजवळच्या नॅशवील एव्हीएशनमध्ये २३ विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती.
या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क म्हणून सुमारे ८० हजार ते एक लाख रुपये उकळण्यात आले होते. या प्रकरणी अन्याय झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या २३ विद्यार्थ्यांसह पालक आणि भाजपा कार्यकर्त्यांविरोधात खोट्या तक्रारीवरून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणांची ठाणे पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे, असे संजय वाघुले व वृषाली वाघुले यांनी निवेदनात म्हटले आहे.
संबंधित शैक्षणिक संस्थांना कोणत्या विद्यापीठाची मान्यता आहे, या संस्थांमधील अभ्यासक्रम कोणत्या संस्थेने वा विद्यापीठाने निश्चित केला आहे, राज्य सरकारच्या कोणत्या विभागाने त्यांना कोणत्या नियमानुसार परवानगी दिली आहे, संबंधित शैक्षणिक संस्था वा प्लेसमेंट एजन्सीचे संबंधित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार आहे का आदींचा उलगडा होण्याची आवश्यकता आहे. तरी या प्रकरणी आपण संबंधित संस्थांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करून माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी तीन शैक्षणिक संस्था व सहा संशयास्पद प्लेसमेंट संस्थांची नावे व पत्ता पोलिसांकडे सादर केला आहे.
ठाण्यात शैक्षणिक सेवेचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनपाच्या शिक्षण विभागाने नुकतीच अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील अनधिकृत शाळांची आकडेवारी ही धक्कादायक असल्याचं समोर येत आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षात जाहीर केलेल्या ८१ अनधिकृत शाळांपैकी ६१ शाळा या एकट्या दिवा परिसरात आढळून आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बोगस शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होण्याचं प्रमाण दिसून येत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.