Shiv Sena Thackeray faction MP Sanjay Raut targets BJP's Chandrashekhar Bawankule
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. काल (दि23) राज्यभरामध्ये शिवसेनेच्या समर्थकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जयंती साजरी केली. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे मेळावे घेत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये पार पडला. यानंतर आता जोरदार वार पलटवार केले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाही की शिवसेनाप्रमुखांचे वारसदारही नाहीत. शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीताने पळून गेले आहेत. शिंदेंच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का? पेपर तरी वाचतो का हा माणूस. काय म्हणतो. आमचं बघू ना आमची मनगटं, तुमच्यावर मनगटं चावण्याची वेळ येणार आहे. तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते, घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे. यावर उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरे घालण्यासारखं आहेत. तुमची सत्ता आणि प्रतिष्ठा कायम राहणार नाही. तुम्ही तात्पुरते आहात. ज्यांनी ही पदे तुम्हाला दिली तेच तुमची पदे काढून घेतील आणि तुमच्यातीलच लोक तुमच्या उरावर बसवतील,” असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आदित्य ठाकरे हे बालिश राजकारणी असल्याचे ते म्हणाले होते. यावरुन प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “हे बावनकुळे तेच गृहस्थ आहेत ना ज्यांनी 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लूटला तेच ना हे. असा बालिशपणा आम्ही करणार नाही. ईडी आणि सीबीआय कुठे आहे? या माणसाला अटक केली पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना महसूलमंत्री करून गुन्हा केला. बावनकुळे तुम्ही 600 कोटींचा भूखंड एक रुपयाला घेतला. आम्हाला द्याल का. कोण बावनकुळे, ते तर रावणकुळे आहेत.” त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे अशी मागणीच खासदार संजय राऊतांनी केली.