mp sanjay raut target mahayuti government over delhi visit political news
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी लागले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये अनेक युती होण्याच्या शक्यता वर्तवल्या जातात. याबाबत आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या निवडणुकीच्या तयारीबाबत मत व्यक्त केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, शंभर टक्के आम्ही त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यातल्या महानगरपालिका आम्ही तयारी सुरू केली. आता प्रभाग 227, 236 हा विषय होता पण निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने ते आदेश दिले आहेत. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील ठाणे निवडणूक होईल. डोंबिवली, कल्याण होईल. आसपास मीरा-भाईंदर, नाशिक, पुणे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्या दृष्टीने तयारी केली आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाची सध्या मनसे नेते राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याच्या चर्चा आहेत. दोन्ही ठाकरे बंधू मागील उणीधुणी विसरुन मुंबई पालिकेसाठी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आहे. खासदार राऊत म्हणाले की, “निवडणुका कशाप्रकारे लढायच्या कोणाबरोबर लढायच्या त्या संदर्भात पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. काही विचार चर्चा संपलेली आहे. आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिले आहेत. तुम्ही आढावा घ्या, महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकटे लढू शकतो का त्यानंतर निर्णय पक्षप्रमुख देतील. मुंबईचा निर्णय हा संपूर्ण देश ज्याकडे बघत आहे मुंबईत काय निर्णय येतील याकडे लक्ष लागले आहे,” असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी चौकशी केली. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “प्रकृतीची चौकशी करणे याला स्नेह किंवा आदर असं काही म्हणत नाही तो एक शिष्टाचार आहे. शरद पवार यांच्या विषयी एवढ्याच आदर आणि शिष्टाचार असता तर पवार यांनी नरेंद्र मोदींना प्रतिकूल परिस्थितीत मदत केली त्यांच्या पक्ष अशा पद्धतीने फोडला नसता त्यांचं घर फोडलं नसतं. नरेंद्र मोदी, अमित शहा जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं देखावा असतो आणि पब्लिसिटी स्टँड असतो. मी किती भावनाशील माणूस आहे हे दाखवतात. एखाद्या व्यक्तीविषयी जसं शिवसेनाप्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला पण अधून मधून भाषणांमध्ये शिवसेनाप्रमुखांचा गुणगान करून मी कसा शिवसेनाप्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं असतं. ढोंग आणि खोटारडेपणा याचा जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ झाली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदी यांना द्यावा दुसरा त्यांना पर्याय नाही,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.