नितेश राणेंविरोधात सत्ताधारीच आक्रमक, ठाकरे गटाकडूनही टीका
Mahayuti Politics: “महायुतीतील सगळ्या पक्षांचा बाप भाजप असल्याने आमचा मुख्यमंत्री बसलाय,” असे वक्तव्य करून भाजप आमदार नितेश राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?” असा थेट सवालही काही मंत्र्यांनी उपस्थित केला, अशी माहिती सूत्रांकडून समजते.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे सहप्रवक्ते तुषार रसाळ यांनी ठाण्यात मुख्य रस्त्यावर एक मोठा बॅनर लावून नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले. या बॅनरवर, “मी तुषार दिलीप रसाळ… दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत,” असा मजकूर झळकला.
म्यानमारमध्ये चीनला मोठा धक्का; बंडखोरांनी मशीनगनने पाडले 72 कोटींचे चिनी लढाऊ विमान
या बॅनरमुळे राणे पिता-पुत्रांविरोधात ठाकरे गटाने थेट आक्रमक भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा नितेश राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अलीकडेच धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या ठसक्याच्या शैलीत भाषण करत, “कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं, तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा,” असा दम भरला होता.
या आधीही त्यांनी, “काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय…” असं विधान करून राजकीय वातावरण तापवलं होतं. त्यांच्या या भाषणशैलीवरून महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार केली. त्यानंतर फडणवीस यांनी नितेश राणेंना समज देत खडसावल्याची माहिती आहे. या संदर्भात फडणवीस म्हणाले, “कुणाचाही ‘बाप’ काढणं योग्य नाही. मी संबंधित आमदाराशी बोललो. ते म्हणाले की माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुमच्या मनात काहीही अर्थ असला, तरी लोकांमध्ये जे प्रतिमान (परसेप्शन) तयार होतं, त्यालाच राजकारणात महत्त्व असतं.”
धक्कादायक ! 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला; अंगावर मारहाणीचे व्रण असल्याचा नातेवाईकांचा
नितेश राणे यांच्या अशा वाक्यांनी महायुतीतील सामंजस्याला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे भाजपकडून अशा वक्तव्यांवर आळा घालण्याचे संकेत मिळत आहेत. भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड आता मनसेकडूनही उठवली जात आहे. नारायण राणे यांनी अलीकडेच प्रकाश महाजनांवर केलेल्या टीकेनंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी राणे पिता-पुत्रांना थेट इशारा दिला आहे.
“नारायण राणे जर राज ठाकरे आणि तुमचे संबंध सांगण्यापलीकडे असतील, तर तुम्ही तुमच्या बोलघेवड्या पुत्राला आवर घालणं अपेक्षित आहे,” असे म्हणत किल्लेदार यांनी नारायण राणेंना खडे बोल सुनावले. याचबरोबर, “महाराष्ट्र सैनिकांना धमक्या देण्याची हिंमत करू नका. आम्ही उगाच कोणाच्या काड्या करत नाही आणि काड्या करणाऱ्याला सोडतही नाही,” अशा शब्दांत त्यांनी नितेश राणेंना इशारा दिला. महायुतीतील ‘बाप’ वादावरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षात आता मनसेच्या एण्ट्रीनं वातावरण आणखी तापलं असून आगामी काळात या वादाला कोण वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.