भाजपमध्ये आणखी एका नेत्याचा प्रवेश; सांगलीच्या विट्यात आता पक्षाची वाढणार ताकद (संग्रहित फोटो)
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नेते, विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उच्च तंत्रशिक्षण मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार सत्यजित देशमुख (शिराळा), भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश केला.
खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वर्धापनदिनी मोठा दणका देत माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील व त्यांचे सुपुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅड. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा मंगळवारी (ता.१०) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत सहभागी होण्याची इच्छा नेत्यांकडे व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी विट्यात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणून भाजप प्रवेशाचा आग्रह केला होता.
विटा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने सत्ताधारी पक्षात सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत नेत्यांनीही व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा अंतिम निर्णय घेतला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘वैभव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने सांगली जिल्ह्यामध्ये ताकद वाढली आहे. त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. पक्षवाढीसाठी त्यांना जबाबदारी दिली जाईल’. अॅड . वैभव पाटील म्हणाले, भाजपच्या राष्ट्रीय विचारधारेशी जोडताना मतदारसंघाच्या विकासाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. माझ्या या प्रवासात मला मार्गदर्शन करणाऱ्या पक्ष नेतृत्वाचे आणि नेहमी माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे, माझ्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे, ज्येष्ठांचे आभार व्यक्त केले.
भाजपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढेही प्रत्येक क्षण झोकून देईन. आपल्या साथीने हे परिवर्तन अधिक सक्षम, अधिक व्यापक होईल यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचेही सांगितले.
खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजापची ताकद वाढली
वैभव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाटील यांच्या शैक्षणिक संस्था, सहकार संस्था, बँक, पतसंस्था यांचे जाळे विणले आहे. त्याचा फायदा भाजपाला पक्ष वाढीसाठी होईल. असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.