Thane Congress Rally : संविधान बचावासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल, हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांना थेट इशारा

Congress Samvidhan Bachav Rally: लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसने ठाण्यात संविधान बचाव रॅली काढली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
Congress Samvidhan Bachav Rally, Thane Congress Rally, Harshwardhan Sapkal,
ठाण्यात काँग्रेसकडून भव्य संविधान बचाव रॅलीचं आयोजनPhoto - Social Media
Published on: 
Updated on: 
  • ठाण्यात काँग्रेसकडून भव्य संविधान बचाव रॅलीचं आयोजन

  • हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर मनुस्मृती आणि संविधानाच्या मुद्द्यावरून टीका

  • देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

Congress Samvidhan Bachav Rally: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा तापला आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसने ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, पुण्यात न्यायालयाच्या आवारात झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या रॅलीत सहभागी झाले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी सपकाळ यांनी उपस्थितांना संविधान बचावाची शपथही दिली.

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी संविधानाने देशातील सर्व जाती-धर्मांना समान अधिकार दिल्याचं सांगितलं. मात्र, केंद्र सरकारकडून सामान्य नागरिकांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधानाचं रक्षण झालं तरच देशाचं रक्षण होईल, असंही ते म्हणाले.

Congress Samvidhan Bachav Rally, Thane Congress Rally, Harshwardhan Sapkal,
पुण्याचं पालकत्व फडणवीसांकडे दिलं तर वाटोळं होईल! रोहित पवारांनी सुनावलं, वाढती गुन्हेगारी गृहमंत्र्यांचं अपयश?

मनुस्मृतीवरून भाजपला सपकाळांचा टोला

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या संविधानाविषयीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मनुस्मृती आणि 'बंच ऑफ थॉट्स'ला महत्त्व देणाऱ्या भाजपला आता संविधानाची आठवण होत आहे, ही केवळ पुतणा मावशीचं प्रेम असल्याची टीका त्यांनी केली.

भाजप सरकार संविधान आणि लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. ठाण्यातूनच संविधानाच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील गुन्हेगारीवरून फडणवीसांना घेरलं

पुण्यात न्यायालयाच्या आवारात झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून सपकाळ यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा दावा करत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

सतेज पाटील, थोरात आणि नसीम खान यांचाही हल्लाबोल

सतेज पाटील यांनी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जनतेने एकत्र येण्याचं आवाहन केलं. तर बाळासाहेब थोरात यांनी समता आणि बंधुतेच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं.

नसीम खान यांनीही संविधानाने दिलेल्या समान अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे ठाण्यातील या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने संविधान, लोकशाही आणि कायदा-सुव्यवस्थेचे मुद्दे केंद्रस्थानी आणले आहेत.

Congress Samvidhan Bachav Rally, Thane Congress Rally, Harshwardhan Sapkal,
Pune Court Firing : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ संतापले; फडणवीस सरकारवर गंभीर आरोप!