फोटो सौजन्य- सोशल मीडिया
गिरीश रासकर / अहमदनगर –सगळीकडे सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत. कोणता उमेदवार कोणाला भारी पडेल यावर चौका-चौकात जनतेत चर्चा रंगत आहेत. यामागील कारण देखील असेच काहीसे आहे. ते म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ लढत पाहायला मिळणार आहे. तिकीट कोणाला भेटणार ते निवडून कोण येणार यावर देखील वेगवेगळे कयास लावले जात आहेत.
अशाच प्रकारची एक चर्चा सध्या संपूर्ण नगर शहरात रंगलेली पहायला मिळत आहे. नगरचा राजकारणामध्ये पुन्हा एका नव्या पर्वाचा आरंभ होणार अशा प्रकारचे पोस्ट सध्या नगर शहरातील अनेकांच्या सोशल मीडियावर ती चर्चा म्हणजे माजी महापौर संदीप कोतकर हे तब्बल १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नगरच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची! सोशल मीडियावर कोतकर समर्थकांकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे आगामी काळात नगरच्या राजकारणात खळबळ उडणार असे चित्र सद्या तरी दिसतेय. सोशल मीडियावर माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमधून देखील चांगलीच चर्चा होत आहे. येत्या काही दिवसांत माजी महापौर हे नगर शहरातील राजकारणात सक्रियपणे काम करताना दिसून येतील का? हा प्रश्न प्रत्येक नगरकराला पडलाय.
संदीप कोतकर यांनी त्यांच्या महापौर काळात केलेली विकासकामे आणि त्यांच्या कार्यकाळात कार्यक्षम महापौर म्हणून त्यांनी तयार केलेली इमेज आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणुकीची लढत ही माजी महापौर विरुद्ध माजी महापौर अशी होणार का? असा प्रश्न देखील सर्वसामान्य जनतेला पडलाय. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय राजकीय गणित असणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
संदीप कोतकरांचा विधानसभेसाठी पक्ष कोणता?
दरम्यान माजी महापौर संदीप कोतकर हे राजकारणात सक्रिय झाले तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत देखील वेगवेगळे कयास लावले जात आहेत. कोतकर कुटुंबीय हे पूर्वी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करत होते. परंतु सद्या त्यांची भाजपाशी चांगलीच जवळीक वाढली असल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळे माजी महापौर संदीप कोतकर हे विधानसभा लढविणार तर कोणत्या पक्षाकडून हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नगर विधानसभेसाठी सर्वच माजी महापौर इच्छुक; पण जनाधार कोणाकडे?
२००३ साली महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजतागायत जे महापौर झाले आहेत त्या सर्वांना आगामी विधानसभा निवडणुक लढविण्याची इच्छा झाली असून सर्वच माजी महापौर विधानसभेसाठी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी करीत आहेत. परंतु यातील काही माजी महापौर हे महापौर पदाचा कार्यकाळ भोगल्या नंतर पुन्हा नगरसेवक म्हणूनही महापालिकेत गेले नाही. त्यामुळे यांकडे पुरेसा जनाधार स्पष्ट नसताना विधानसभेसारखी निवडणूक लढवावी का? असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे.
कोतकरांच्या एन्ट्रीने केडगावमध्ये “कहीं खुशी कहीं गम”!
तब्बल 14 वर्षानंतर कोतकर यांच्या राजकारणातील एंट्रीने केडगाव मध्ये “कही खुशी कही गम” असे वातावरण सध्या तरी पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर हे एका समारंभासाठी केडगाव येथे असताना त्यांच्या हितचिंतकांकडून केडगावमध्ये मोठी रॅली काढण्यात आली होती. त्यानंतरच नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा कोतकरांची एन्ट्री होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. तर अनेक वर्षांपासून कोतकरांचे विरोधक असलेले नेते तसेच कार्यकर्ते हे प्रचंड अस्वस्थ झाल्याचे समजते.