
फोटो सौजन्य - Social Media
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी नगरपालिकेत विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला सत्ताधारी गटाकडून माजी नगराध्यक्ष किसन शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. तर विरोधी आघाडीच्या वतीने मिलिंद ढेबे यांच्यासह तीन उमेदवारांची नावे सादर करण्यात आली होती. मात्र, सत्ताधारी गटाने सुचवलेल्या किसन शिंदे यांच्या उमेदवारीवर विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. विरोधी आघाडीच्या गटनेत्यांनी सभागृहात आपली भूमिका मांडताना, उमेदवारी प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केल्या. या आक्षेपांमुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सत्ताधारी गटाच्या गटनेत्यांनी किसन शिंदे यांची उमेदवारी वाईचे प्रांताधिकारी यांनी वैध ठरविल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांना कोणतेही कायदेशीर महत्त्व नसल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे सांगितले.
यानंतर विरोधी आघाडीने या प्रकरणात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा देत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी गटातील अनुभवी नगरसेवकांनी हा दबाव झुगारून लावत विरोधकांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले. परिणामी, सभेतील वातावरण हळूहळू शांत झाले आणि निवड प्रक्रियेचा पुढील टप्पा पार पडला. अखेर पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी अधिकृतपणे घोषणा करत सत्ताधारी गटाकडून किसन शिंदे आणि विरोधी गटाकडून मिलिंद ढेबे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर सभागृहातील सर्व नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.
या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, नगरसेवक अफजल सुतार, रविंद्र कुंभारदरे, संतोष शिंदे, विमलताई पाटील, संजय जंगम, रोहित ढेबे आदी नगरसेवकांनी आपली मते मांडली. निवड जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक किसन शिंदे आणि मिलिंद ढेबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या विशेष सभेला नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील हेही उपस्थित होते. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीमुळे महाबळेश्वर नगरपालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.