
महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी तब्बल...
दाखल झालेल्या अर्जांमध्ये जिल्हा परिषदेच्या तळदेव गटासाठी ०९, भिलार गटासाठी ०७ अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समिती अंतर्गत कुंभरोशी गणासाठी १०, तळदेव गणासाठी ११, मेटगुताड गणासाठी ०५ आणि भिलार गणासाठी ०८ अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत एकूण ५० नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील निवडणूक लढती अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपा, शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांच्या मिरवणुका काढत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात दिवसभर उत्साहपूर्ण आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
प्रचारातही तीव्र चुरस पाहायला मिळणार
निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यानुसार दिनांक २२ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे, तर २७ जानेवारी ही माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण आमने-सामने असतील, हे स्पष्ट होणार आहे. राजकीय समीकरणांचा विचार केला तर तळदेव गट तसेच अंतर्गत तळदेव गण आणि कुंभरोशी गण या ठिकाणी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. या भागात दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून, प्रचारातही तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे. भिलार गटात सध्या राष्ट्रवादीचे प्राबल्य मानले जात असले तरी भाजपानेही येथे आपली ताकद वाढवली आहे.
तळदेव गट, भिलार गणांत प्रतिष्ठेची लढाई
राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य संजय गायकवाड हे यावेळी जिल्हा परिषदेच्या तळदेव गटातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भिलार या प्रतिष्ठेच्या गणांमध्ये राष्ट्रवादीकडून भिलारच्या माजी सरपंच वंदना भिलारे लढत आहेत, तर तालुक्याचे भाजपाचे तालुका प्रमुख अनिल भिलारे यांनी आपल्या पत्नी सुप्रिया अनिल भिलारे यांना उतरविल्याने ही प्रतिष्ठेची लढाई होणार आहे.