AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस (Photo Credit- X)
मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मध्ये एमआयएमच्या संपूर्ण पॅनलने दणदणीत विजय मिळवला. आव्हाडांचे एकेकाळचे कट्टर समर्थक युनूस शेख यांच्या कन्या सहर शेख यांनी मुंब्र्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. सहर शेख यांनी विजयानंतर थेट जितेंद्र आव्हाडांना आव्हान देत, “कैसा हराया..?” असे म्हणत डिवचले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सहर शेख यांनी विजयानंतर काढलेल्या मिरवणुकीत एक आक्रमक विधान केले होते. त्या म्हणाल्या, पुढील निवडणुकीत आम्ही संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ जिंकू. विरोधकांना येथून हाकलून लावू आणि मुंब्र्यातील प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल. येत्या काळात संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल. या वादग्रस्त विधानाची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ नुसार नोटीस बजावली आहे. समाजात असंतोष किंवा तेढ निर्माण होईल असे कोणतेही भाषण करू नये. इंटरनेट किंवा सोशल मीडियावर बोलताना संयम बाळगण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी १३ महानगरपालिकांमध्ये एमआयएमने आपली ताकद दाखवली आहे. एकूण १२५ जागांवर पक्षाने विजय मिळवला असून, एकट्या ठाणे महानगरपालिकेत ५ उमेदवार निवडून आले आहेत. या निकालांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सहर शेख या मुंब्र्यातील वजनदार नेते युनूस शेख यांच्या कन्या आहेत. युनूस शेख हे पूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते, मात्र काही काळापूर्वी त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या मुलीने थेट आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.






