'...तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देणार'; चौफेर टीकेनंतर माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकाडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळाच्या सभागृहातच मोबाईलमध्ये एक खेळ खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. असे असताना त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. त्यावर कृषीमंत्री कोकाटे यांनी चौकशीत काय ते समोर येईल. जर मी दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल एकामागून एक वादग्रस्त विधाने आणि विधानसभा अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याचे म्हटले जात होते. त्यावर मंत्री कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘याप्रकरणाची सभापती, अध्यक्ष आधी चौकशी करतील. या चौकशीतून सत्य काय आहे ते बाहेर येईल. जर मी दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन. ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेदेखील वाचा : महायुती सरकारमधील ‘या’ मंत्र्याचे पद धोक्यात; पक्षाकडूनच दिले गेले महत्त्वपूर्ण संकेत
दरम्यान, मला रमी हा गेम खेळताच येत नाही. व्हिडिओचा विषय छोटा आहे. विनाकारण माझी बदनामी सुरु आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मला सभागृहाचे नियम ठाऊक
मला सभागृहाचे नियम ठाऊक आहेत. राजीनामा देण्याइतके सभागृहात घडलं तरी काय? कोर्टात अब्रूनुकसानाचा दावा केल्यानंतर व्हिडिओ दाखवावा लागेल. ज्यांच्याकडे मोठा व्हिडिओ आहे त्यांनी तो कोर्टात दाखवावा, असे त्यांनी म्हटले आहे.
बेजबाबदार वर्तन स्वीकारार्ह नाही
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, ‘अजित पवार यांनी पीक विमा आणि कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर यापूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानांवर मंत्री कोकाटे यांना इशारा दिला होता. आता रमी खेळण्याच्या व्हिडिओवर कोकाटे यांनी स्पष्टीकरण देणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या संकटाच्या वेळी असे बेजबाबदार वर्तन स्वीकारार्ह नाही’.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
‘हे अतिशय चुकीचे आहे. अशाप्रकारे विधानभवनामध्ये चर्चा चालते, आपले कामकाज नसले तरी आपण गंभीर असणे आवश्यक आहे. सभागृहात कामकाजाचे कागद वाचता, इतर काही वाचता ते ठीक आहे. मात्र, रमी खळणे हे निश्चितच योग्य नाही’.