
Maharashtra Politics: कॉँग्रेसचा 'हात' मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्...
कॉँग्रेसने प्रदीप पाटील आणि 12 नगरसेवकांना केले निलंबित
अंबरनाथमध्ये प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची कारवाई
प्रदीप पाटील आणि 12 नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याचा अंदाज
Ambarnath Politics: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. जस जसे निवडणूक जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापले आहे. अंबरनाथमध्ये भाजप आणि कॉँग्रेसने युती केली होती. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. मात्र आता यामध्ये ट्विस्ट आला आहे. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आणि 12 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. अंबरनाथचे कॉँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांच्यासोबत 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. ऐन निवडणुकीत कॉँग्रेसला हा मोठा धक्का समजला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदीप पाटील आणि 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील काही आरोप केले आहेत. कॉँग्रेसने निवडणुकीवेळी आम्हाला एकदाही विचारले नाही. आम्ही यांच्या जोरावर निवडून आलो असे ते यावेळी म्हणाले. सर्वच पक्षांमध्ये अनेक जण मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत कोण कोणत्या पक्षात राहतो हे पहावे लागणार आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार
अंबादास दानवेंचा जोरदार प्रहार
कॉंग्रेस आणि भाजपच्या युतीवर टीका करताना अंबादासा दानवे म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये आम्ही काँग्रेससोबत असताना आमच्यावर सातत्याने टीका केली जात होती. आता हीच काँग्रेस अंबरनाथमध्ये भाजपसोबत आहे. संजय राऊत यांनी याबाबत अतिशय योग्य शब्द वापरला आहे — दुतोंडी गांडूळ. भाजप म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. गांडूळ जसं इकडच्या तोंडानेही चालतं आणि तिकडच्या तोंडानेही चालतं, तसंच भाजप करत आहे. सध्या गांडूळाचं काम भाजप करत आहे; फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात करत आहे,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती
त्याचबरोबर महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. उघड उघड भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. याबाबत दानवे म्हणाले की, “वडेट्टीवार यांनी काहीही चुकीचे बोललेले नाही. भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा पक्ष आहे. ज्या पद्धतीने सध्या एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू आहे, त्यावरूनच दोन्ही पक्ष भाजपसाठी ओझे झाले असल्याचं दिसतं. हे भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट होत आहे. कधीतरी भाजप हे ओझं खाली उतरवेल, अशीच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती आहे,” असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.