Uday Samant reaction to Bhaskar Jadhav joining Shinde group who is upset with Uddhav Thackeray
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊन दोन महिने झाले आहेत. तरी दारूण झालेला पराभव महाविकास आघाडी विसरु शकलेली नाही. महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांवर पराभवाचे खापर फोडत आहेत. तसेच नाराजी देखील व्यक्त करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे घोषित देखील करण्यात आले आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षकारभारमध्ये सुरु असलेल्या भोंगळ कारभारावरुन भास्कर जाधव आक्रमक झाले होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत शिंदे गटाचे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
एका वाहिनीशी संवाद साधताना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले की, “कदाचित आमच्यावर जे प्रसंग उभे राहिले ते भास्कर जाधवांवर उभे राहिले नसतील. त्यांना त्याचा अनुभव आला नसेल. त्यामुळे त्यांना वाटत असेल की जे काही चाललंय ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चाललंय. शेवटी एक्स्ट्रीम टोक येतं, जेव्हा आपल्याला खात्री होते की इथं काँग्रेसचंच ऐकलं जातं किंवा काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष चालवला जातो, त्यामुळे भास्कर जाधवांचं हे मत बनलं असावं”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे भास्कर जाधव यांना ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये घेणार का यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तर भास्कर जाधव म्हणाले की, “ते येण्याचं किंवा न येण्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. पण भास्कर जाधव यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली मिळणार असेल तर आम्हाला आनंद आहे.” असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच पक्षातील संघटनेमध्ये बदल करण्याचा सल्ला भास्कर जाधव यांनी दिला आहे. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करा, असा सल्ला भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना दिला आहे. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्या नावाने फर्मान काढावे लागतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, अशी नाराजीनही भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.