
ज्ञानेशांविरोधात आज ठाकरे बंधूंची 'गर्जना'
मुंबई : मतदारयादीतील विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेला (SIR) देशभरातून विरोध होत असतानाच आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी मुंबईत विराट गर्जना आहे. या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, आता मोर्चाची सुरुवात मेट्रो सिनेमापासून होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा होण्यास सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होऊन तो मुंबई महापालिकेसमोर येईल. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरून भाजपवरही निशाणा साधला. निवडणूक आयोगावर टीका केल्यानंतर भाजपच्या पोटात का दुखते, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे मोर्चात ज्ञानेश कुमार यांच्यासोबतच भाजपवरही ठाकरे बंधूंचा निशाणा असण्याची शक्यता आहे.
मोर्चाकडे लागले सर्वांचे लक्ष
एसआयआर आणि मतदार यादीतील कथित गोंधळावरून देशभरात आंदोलन सुरू असताना मुंबईतील या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मोर्चात ठाकरे बंधू ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कोणत्या घोषणा देतात आणि नेमक्या कोणत्या मागण्या मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नरेश म्हस्के यांची टीका
नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गट आणि मनसेच्या आगामी निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, “अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काम करत आहेत,” असे विधान केले आहे.