Uddhav Thackeray Mumbai Press Conference Live on MNS Alliance with Raj Thackeray
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे देखील बोलले जात आहे. या संदर्भात चर्चा सुरु असताना राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये मनसे पदाधिकारी वैभव दळवी यांनी प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटामध्ये असणाऱ्या सुजाता शिंगाडे यांनी देखील ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटामध्ये इनकमिंग वाढले आहे. यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करुन खूप मोठी चूक केली असल्याची कबुली यावेळी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हे त्यांनी जवळून पाहिलं
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच राज ठाकरेंसोबत युती करणार या प्रश्नाचे देखील उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सुजाता शिंगाडे यांनी शिवसेना सोडली तेव्हा आम्हाला धक्का बसला होता. वाईटही वाटलं होतं. एवढी जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडून का आणि कशी शकते असा प्रश्न आम्हाला पडला होता. तिकडंची बेबंदशाही, अनागोंदी त्या बघून आल्या आहेत. लोक तिकडे का जात आहेत आणि काय करत आहेत हे त्यांनी जवळून पाहिलं, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसेसोबत युती होणार का?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. युतीचा प्रस्ताव पाठवला तर मनसे विचार करेल असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, बघू…जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यामध्ये उत्तर दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.