
Uddhav Thackeray and Raj Thackeray joint interview by Raut manjrekar Part Two Political News
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग जोरदार गाजला. यानंतर आता दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला आहे. दुसऱ्या भागामध्ये मुंबईच्या विकासाचा प्रश्न, अदानींचा मुद्दा तसेच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रिपूर्ण संबंध अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. मुंबई महाराष्ट्रपासून वेगळे होण्याचा डाव असल्याचा दावा ठाकरे बंधूंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
हे देखील वाचा : भाजपच्या निशाण्यावर आले महेश मांजरेकर; ठाकरे बंधूंची मुलाखत घेताच राजकारण न पडण्याचा सल्ला
याबाबत राज ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची इच्छा चांगली आहे पण मुळात त्यांच्या हातामध्ये काहीच नाही. जे वरुन सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरुन जर सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची तर त्यांच्या समोर सही करण्यापलिकडे काहीच पर्याय नसतो. त्यामुळे वरच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. यांच्यामध्ये काय आहे याचे काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यांनी चंद्र सुर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती बसलेले जे दोघेजण आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे हे कळणे महत्त्वाचे आहे. आणि ते कळत आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
तसेच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होण्याचा डाव असल्याच्या दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही. पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जात आहे. कोणी येत आणि सांगत की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे. आमच्यावर हिंदी सक्ती करणार, आमची अस्मिता, संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवणार तर या गोष्टीला काही अर्थ नाही. यांना बस म्हटलं की बस आणि उठ म्हटलं की उठ म्हणणारी ही लोक आहेत. त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.