Uddhav Thackeray's special strategy for Mumbai Municipal Corporation elections
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना ठाकरे गटाची मुंबईमध्ये मनसेसोबत युती होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनिती आखली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून महानगर पालिकेच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात झाली आहे. मातोश्रीवर या संदर्भात बैठक झाली आहे. या झालेल्या बैठकीत ठाकरे गटाकडून मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे. उपनेत्यांनी मतदार संघात जाऊन आढावा घेणे अपेक्षित आहे. तसेच, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख इतर पदाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन चर्चा करायची आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारच्या वतीने प्रभागासंदर्भात शासन निर्णय काढला असून ठाकरे गटाच्या वतीने पालिकेची तयारी केली जात आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत. मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे, तर मुंबईत मात्र जुने 227 एकसदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेबाबत झालेल्या या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच 227 एकसदस्यीय प्रभागांनुसार होणार आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना हे प्रभाग वाढवून 236 करण्यात आले होते. मात्र महायुती सरकार आल्यावर पुन्हा 227 प्रभाग संरचना लागू करण्यात आली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती, परंतु ती फेटाळण्यात आली, त्यामुळे आता 227 प्रभागांनुसारच मुंबईत निवडणुका होणार आहेत.
कोणत्या नेत्याकडे कोणता विभाग?
याप्रमाणे ठाकरे गटाने मुंबई पालिका निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी नेत्यांवर सोपवली आहे. यामध्ये दहिसर, बोरिवली, मागाठाणे या विभागाची जबाबदारी अमोल कीर्तीकर यांच्याकडे असणार आहे. तसेच उद्धव कदम यांच्याकडे चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम तर विलास पोतनीस यांच्याकडे दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व या विभागांची जबाबदारी असणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच विश्वासराव नेरूरकर यांच्याकडे वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिमची जबाबदारी रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे असणार आहे. गुरुनाथ खोत यांच्याकडे चांदिवली, कलीना, कुर्ला आणि नितीन नांदगावकर यांच्याकडे विक्रोळी, भांडुप, मुलुंड या विभागांचा कारभार असणार आहे. सुबोध आचार्य यांच्याकडे घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द आणि मनोज जमसूतकर यांच्याकडे अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा असे विभाग असणार आहेत. धारावी, माहीम, वडाळा हे विभाग अरुण दूधवडकर, वरळी, दादर, शिवडी हे अशोक धात्रक यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. तसेच सचिन अहिर यांच्याकडे मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी या विभागाची जबाबदारी असणार आहे.