नगरविकास विबागाकडून पुणे-ठाण्यासह 9 महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या दिशेने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नगरविकास विभागाने पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, उल्हासनगर आणि मिरा-भाईंदर या नऊ महापालिकांमध्ये नवीन प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश संबंधित आयुक्तांना दिले आहेत. या आदेशानुसार, संबंधित महापालिकांमधील आयुक्तांनी नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करायचा आहे. यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.
याशिवाय मुंबई महापालिकेबाबत मात्र महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. महानगरपालिका निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जाणे, प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू राहणे, आणि राजकीय पक्षांमध्ये असलेली धुसफूस पाहता हा आदेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे राज्यभरातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यात महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता हालचालींना गती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने कामाला सुरूवात केली आहे. निवडणुकीपूर्वीची महत्त्वाची पायरी म्हणून प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या सर्व ठिकाणांमध्ये आता प्रशासनाने प्रभाग रचना प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रभागांची संख्या, रचना आणि लोकसंख्येवर आधारित निकष याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral
प्रभाग रचनेच्या अहवालानंतर निवडणूक आयोग पुढील कार्यक्रम जाहीर करेल, अशी शक्यता असून, त्यामुळे लवकरच महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत.
मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे, तर मुंबईत मात्र जुने 227 एकसदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेबाबत झालेल्या या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच 227 एकसदस्यीय प्रभागांनुसार होणार आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना हे प्रभाग वाढवून 236 करण्यात आले होते. मात्र महायुती सरकार आल्यावर पुन्हा 227 प्रभाग संरचना लागू करण्यात आली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती, परंतु ती फेटाळण्यात आली, त्यामुळे आता 227 प्रभागांनुसारच मुंबईत निवडणुका होणार आहेत.