निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 4 महिन्यांत घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यावरूनच अनेक पक्षांकडून आता तयारीही केली जात आहे. त्यातच आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
पवारांच्या राष्ट्रवादीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून वेगवेगळे मतप्रवाह आहे. भाजप विदर्भात राष्ट्रवादीला जादा जागा देणार नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी वेगळी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विदर्भात भाजप व राष्ट्रवादीमध्ये मतांतरे दिसत आहे. या बाबींची दखल घेत पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.27) मुंबईत चर्चेला बोलावले आहे. यात सदस्यता अभियान व निवडणुकीबाबत चर्चा होईल. प्रसंगी सदस्य अभियान अपयशी ठरल्याने नाराजीही व्यक्त केली जाणार असल्याची चर्चा आहे.
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या कानपिचक्यावरून शुक्रवारचे नागपुरातील विदर्भ विभागीय मेळावा चांगलाच गाजला. यात त्यांनी सदस्य नोंदणी अभियानाला मिळालेल्या थंड प्रतिसादाचा उल्लेख करत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. त्यामुळे अनेकांचे चेहरे उतरले आहे. तर, माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि पक्षाचे सरचिटणीस व विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी महायुतीत सोबत न लढता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची सूचना केली आहे.
भाजपकडून कुठलाही प्रतिसाद नाही
दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यातील नाराजीही उफाळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्याचे ठरवले आहे. यात जिल्हानिहाय सदस्यता नोंदणीवर चर्चा केली जाणार आहे. यासोबतच स्वबळावर लढण्याच्या प्रस्तावावर काय तयारी आहे, याची माहितीही घेतली जाणार आहे.
प्रफुल्ल पटेलांवरही अनेकांची नाराजी
पटेलांनी नागपुरात पदाधिकाऱ्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यामुळे जाहीरपणे
पदाधिकाऱ्यांचा अवमान झाल्याने अनेकांचे चेहरे पडले होते. यामुळे नाराज असलेल्या अनेकांनी पटेलांबद्दलही नाराजीचा सूर आळवला. पटेल आताच नव्हे तर अनेक वर्षांपासून पक्षाचे मोठे नेते आहे. ते पक्षाचे चेहरे आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांचा वावर आहे. कायम खासदार असतात. विदर्भात पक्ष वाढला नाही, हे त्यांचेही अपयश नाही का? असा सवाल अनेकांनी व्यक्त केला.
…तर पक्षातून काढून टाकतील
जाहीरपणे बोलले तर पक्षातून काढून टाकतील याकडे लक्ष वेधत पटेल यांच्यामुळेही पक्ष विदर्भात वाढला नाही, हे पक्षाने समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष असल्याने त्यांची जबाबदारी होती. जाहीरपणे अवमान करण्यापेक्षा बैठकीत विचारणा केली असती तर येणाऱ्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या गेल्या असत्या, असे काहींचे म्हणणे होते.