
लक्ष निवडणूक निकालाकडे
मुंबई : राज्यातील तब्बल २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. गेल्या अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, खऱ्या अर्थाने या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठा रंग भरला आहे. आता सर्वांचे लक्ष येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याची चुरस दिसून आली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनेक प्रचारसभा घेत ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दाखवून दिले. भाजपने, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी परस्परांविरुद्धही अनेक ठिकाणी लढत दिली आहे. त्यामुळे या निकालातून महायुतीत कोणता पक्ष सर्वाधिक नगरपरिषदा व नगरपंचायतींवर वर्चस्व सिद्ध करतो, हे स्पष्ट होणार आहे. हा निकाल भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो.
दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या महाविकास आघाडीतील नेत्यांनीही जोरदार प्रचार केला. हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांसारख्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली.
मतदारांचा कौल कोणाला? 21 डिसेंबरला होणार स्पष्ट
तब्बल दशकभरानंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये ग्रामीण आणि निम-शहरी भागातील मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे निकालानंतर स्पष्ट होईल. हा निकाल विरोधकांची ताकद तपासणारा आणि त्यांच्या भविष्यातील रणनीतीला दिशा देणारा ठरणार आहे.
सोलापुरात मतदानाला जोरदार प्रतिसाद
स्धानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मतदान होत आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सोलापूरमध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सायंकाळी बंद करण्यात आले.
२७०० हून अधिक प्रशिक्षणार्थी कर्मचारी
सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १० नगरपरिषदेसाठी मंगळवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रकियेस प्रारंभ झाला. जिल्ह्यात एकूण ४९९ मतदान केंद्र असून, १३२२ बॅलेट युनिट व ६११ कंट्रोल युनिटच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले . मतदान प्रकिया शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी बूथ व केंद्रनिहाय तीन पोलीस तैनात करण्यात आले होते. एक हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. २७०० हुन अधिक प्रशिक्षणार्थी कर्मचारी निवडणूक प्रकियेत सहभाग घेतला आहेत.
हेदेखील वाचा : Local Body Elections : विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचे टीकास्त्र