कुठल्याही शुभ कार्यात गणपतीला सर्वात पहिले का पूजतात? (फोटो सौजन्य: iStock)
सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. खरंतर हिंदू धर्मात गणपती बाप्पाला एक विशेष स्थान आहे. त्यातही गणपती बाप्पा चिमुकल्यांचा आवडता देव. आता बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला आहे. मुंबई आणि पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन मिळावे यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहे. गणपती हा चौसष्ट कलांचा अधिपती, विद्येचा देवता आहे ज्यामुळे त्याच्या आशीर्वादानेच कामाची सुरुवात होते.
Ganesh Chaturthi 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
आजही एखादा व्यवसाय किंवा नवी सुरुवात करताना सर्वप्रथम गणपतीला पुजले जाते. प्रथम तुला वंदितो म्हणत अनेक जण आयुष्याची नवी सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करतात. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की हिंदू धर्मात इतके सगळे देव असून देखील सर्वात पहिले गणपतीलाच का पुजले जाते. चला यामागची रंजक कथा जाणून घेऊयात.
एकदा देवतांमध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद निर्माण होण्याचे कारण म्हणजे प्रथम पूजनीय कोण? काही केल्या या प्रश्नाचे उत्तर देवांना मिळत नव्हते. म्हणूनच या प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी सर्व देव महादेवांकडे गेले. यानंतर एक स्पर्धा ठरवण्यात आली. जो कोणी या महाकाय विश्वाची प्रदक्षिणा पहिली करून दाखवेल तोच सर्वप्रथम पूजनीय असेल.
Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला दुर्वा आवडण्याचं कारण तुम्हाला माहितेय का ?
विश्वाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सगळे देव वेगाने निघाले. मात्र, आपले लाडके गणपती बाप्पा तिथेच आपल्या मूषकासोबत उभे होते. सगळे चकित झाले की गणेश अजूनही इथेच काय करत आहे. यानंतर गणपती बाप्पाने आपल्या मूषकावर बसून जे विश्वाचे पालनकर्ते आहेत अशा शिव-पार्वतीच्या भवती प्रदक्षिणा घातली. म्हणूनच तर बाप्पाला बुद्धीचे देवता म्हणतात. यानंतर भगवान शंकरानी घोषणा केली यापुढे प्रत्येक शुभकार्यात गणेशला सर्वप्रथम पुजले जाईल. तेव्हापासून गणपती बाप्पा आपले आद्यदैवत झाले.