
फोटो सौजन्य- pinterest
गणेशोत्सवाचा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या उत्सवासाठी चाकरमानी मुंबई, पुणे इतर सर्व शहरांमधून कोकणामध्ये दाखल होतात आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे एक गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात एक आगळीवेगळी अशी परंपरा आहे. काय आहे या मंदिराची परंपरा जाणून घेऊया.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर 150 वर्षे जुने आहे. गणेश चतुर्दशीसोबत माघी गणेश जयंती उत्सवलाही अलीकडे बऱ्याच ठिकाणी गणपतीचे पूजन केले जाते. येथे अश्विन कृष्ण अमावस्येला म्हणजेच दिवाळीच्या सणांमधील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाजत गाजत बाप्पाची स्थापना केली जाते. विधिवत बाप्पाची पूजा होते. या बाप्पाचे विसर्जन पाच सात 21 दिवसांनी होत नाही तर होळीच्या दोन दिवस आधी होते म्हणजेच तीन ते चार महिन्यानंतर बाप्पाचे विसर्जन होते. वेंगुर्ला सागरेश्वर किनाऱ्याजवळ या बाप्पाचे विसर्जन केले जाते. त्यापूर्वी मंदिरांमध्ये म्हामने या महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम उभादांडा गावांसह पंचक्रोशीतील गणेशभक्त आवर्जून येथे उपस्थित राहतात.
या काळामध्ये जागर, फुगड्या, गोफनृत्य, भजन, कीर्तन, सत्यनारायण पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विसर्जनानंतर मंदिरामध्ये बाप्पाची प्रतिमा स्थापन केलेली असते. हा बाप्पा नवसाला पावणारा आहे अशी पौराणिक कथा आहे. या ठिकाणाला मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर या ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचतात.
या मंदिरांमध्ये माघ महिन्यात संकष्टी चतुर्थीला भव्य जत्रोत्सवही असतो. या मंदिरांमध्ये महाआरती झाल्यानंतर गणपती खांद्यावर घेऊन ही मिरवणूक वाघेश्वर मंदिरामार्गे सागरेश्वर किनारी निघते. विसर्जन मार्गादरम्यान ठिकठिकाणी थांबून भजन केले जाते.
बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर मंदिरात त्याचा सहवास आहे, अशी मान्यता आहे. या मंदिरांमध्ये भाविकांकडून नवसांची परतफेड केली जाते. विसर्जनानंतर मंदिरात रिक्त आसनावर गणपतीचा फोटो ठेवला जातो. गणेशभक्त दर मंगळवार, संकष्टी चतुर्थी, विनायकी गणेश चतुर्थी इत्यादी दिवशी मंदिरांमध्ये येऊन श्रद्धेने फोटोसमोर नतमस्तक होतात. या मंदिरांमध्ये दिवा, अगरबत्ती लावून बाप्पाची पूजा केली जाते.
या मंदिरात जाण्यासाठी वेंगुर्ले बस स्थानकावर पोहोचावे. त्यानंतर उभादांडाकडे जाणारी बस किंवा रिक्षा पकडावी. उभादांडा गावात पोहोचल्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने तुम्ही या मंदिरात पोहोचू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)