
सलग तीन वर्षे अखंड महाभारत लिहिताना गणरायाची लेखणी का तुटली? काय आहे वेदव्यासांच्या चतुर अटीमागील पौराणिक कथा?
Mahabharata Story: महाभारतात अर्जुनाच्या रथावर हनुमान कसे आले? काय आहे यामागील पौराणिक कथा
महाभारत म्हणजे हिंदू धर्मातील एक असे महाकाव्य आहे जे धर्म, नीती, ज्ञान आणि जीवनातील रहस्यांचा उलगडा करते. महाभारत म्हणजे फक्त युद्धाचं वर्णन नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यात प्रकाश टाकलेला आहे. कुटुंब ,मैत्री आणि वैर यांचे संबंध किती खोल आणि गुंतागुंतीचे असतात हे सुद्धा महाभारतात शिकवलेले आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, महर्षी वेदव्यासांना महाभारतासारखे विशाल महाकाव्य लिहून ठेवायचे होते. त्यासाठी अत्यंत बुद्धिमान आणि वेगाने लेखन करू शकणारा लेखनिक आवश्यक होता. त्यांनी भगवान श्रीगणेशांना ही जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. भगवान गणेशांनी लेखनिक होण्यास होकार दिला, मात्र एक अट घातली. “मी लेखन सुरू केल्यानंतर माझी लेखणी एक क्षणही थांबता कामा नये. तुम्ही अखंड श्लोक सांगत राहिले पाहिजेत,” अशी त्यांची अट होती.
महर्षी वेदव्यासांनीही त्यावर एक चतुर अट ठेवली. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक श्लोकाचा अर्थ पूर्णपणे समजल्याशिवाय तुम्ही तो लिहायचा नाही.” या अटीमुळे जेव्हा जेव्हा वेदव्यासांना पुढील श्लोक रचण्यासाठी वेळ हवा असे, तेव्हा ते अत्यंत गुंतागुंतीचे आणि गहन अर्थ असलेले श्लोक सांगत. त्या श्लोकांचा अर्थ समजून घेण्यात गणेश काही क्षण व्यस्त राहत आणि त्या काळात वेदव्यास पुढील श्लोकांची रचना करायचे.
पौराणिक कथांनुसार, अशा प्रकारे सलग तीन वर्षे महाभारताचे लेखन सुरू राहिले. या काळात भगवान गणेशांनी अखंड लेखन केले आणि महर्षी वेदव्यासांनी जगाला महाभारतासारखा अमूल्य ग्रंथ दिला. याच कथेशी आणखी एक प्रसिद्ध आख्यायिका जोडली जाते. लेखनादरम्यान लेखणी तुटल्यानंतर भगवान गणेशांनी विलंब होऊ नये म्हणून स्वतःचा एक दात मोडून त्यालाच लेखणी म्हणून वापरल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांना ‘एकदंत’ असे नाव प्राप्त झाले, अशी धार्मिक मान्यता आहे.