
फोटो सौजन्य- गुगल
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होणार असून तो २४ जुलै २०२८ पर्यंत चालणार आहे. हिंदू पंचांगानुसार जेव्हा सूर्य आणि चंद्र कर्क राशीत आणि बृहस्पती (गुरु) सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा’ आयोजित केला जातो. सुमारे २१ महिने चालणाऱ्या या महासोहळ्यात देशाविदेशातून लाखो भाविक गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी येतात. यावेळी नद्यांमधील पाणी हे सामान्य पाणी नसून ते ‘अमृत’ बनते, त्यामुळे यावेळी शाही स्नान केल्याने पुण्य लाभते, अशी हिंदू धर्मीयांची गाढ श्रद्धा आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची अधिकृत सुरुवात ऑक्टोबर २०२६ मध्ये होत असली, तरी मुख्य धार्मिक विधी आणि गर्दीचा काळ ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२७ या महिन्यांत असणार आहे.
३१ ऑक्टोबर २०२६: कुंभ पर्वाचा भव्य प्रारंभ होणार आहे. नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर दुपारी १२:०२ वाजता अधिकृत ध्वजारोहण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.
२९ जुलै २०२७: नगर प्रदक्षिणा (नाशिक शहराची पवित्र परिक्रमा).
०२ ऑगस्ट २०२७ (आषाढ सोमवती अमावस्या): पहिले अमृत स्नान (शाही स्नान)
३१ ऑगस्ट २०२७ (श्रावण अमावस्या): दुसरे व मुख्य अमृत स्नान (शाही स्नान)
११ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद एकादशी): तिसरे अमृत स्नान (फक्त नाशिक येथे – वैष्णव आखाड्यांसाठी)
१२ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद एकादशी): तिसरे अमृत स्नान (फक्त त्र्यंबकेश्वर येथे – शैव आखाड्यांसाठी).
•२४ जुलै २०२८: कुंभमेळ्याचा अधिकृत समारोप (ध्वजावतरण – ध्वज उतरवणे).
कोट्यवधी भाविक आणि साधू-संतांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे २४,२२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा भव्य विकास आराखडा मंजूर केला आहे. या अंतर्गत खालील महत्त्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
शैव आणि वैष्णव आखाड्यांची व्यवस्था ऐतिहासिक वादांमुळे पेशवेकालीन परंपरेनुसार, शैव साधू त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर तर वैष्णव (अखाडे आणि महांत) नाशिकच्या रामकुंड आणि तपोवन परिसरात स्नान करतील. त्यांच्या निवासासाठी तपोवनात भव्य ‘साधू ग्राम’ उभारण्यात येत आहे.
गोदावरी नदीवर वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन्ही शहरांमध्ये नवे आणि सुरक्षित विस्तीर्ण घाट (Bathing Ghats) बांधण्यात आले आहेत. नदी पात्राचे शुद्धीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
लॉजिस्टिक आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट: शहराच्या चारही बाजूंनी जोडणारे रिंग रोड तयार केले आहेत आणि गर्दीच्या दिवशी खास पार्किंग झोन आणि होल्डिंग एरिया बनवले गेले आहेत.
भाविकांसाठी डिजिटल माहिती देणारी विशेष वेबसाइट Kumbh Mela Portal सुरू करण्यात आली आहे. तसेच गर्दीच्या दिवसां व्यतिरिक्त येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘हेली-टूरिझम’ (हेलिकॉप्टर सफर) चेही नियोजन आहे. धार्मिक पर्यटन होणार आहे..
सुरक्षा आणि आरोग्य यंत्रणा: लाखो लोकांच्या आरोग्यासाठी तात्पुरती भव्य रुग्णालये, २४ तास रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
हिंदू संस्कृतीमध्ये कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक सण नसून तो मानवी श्रद्धा, अध्यात्म आणि वैश्विक ऊर्जेचा जगातील सर्वात मोठा सोहळा मानला जातो. हजारो वर्षे जुनी परंपरा असलेला हा मेळा जगातील असा एकमेव सोहळा आहे, जिथे कोणत्याही निमंत्रणाशिवाय कोट्यवधी भाविक एकाच भावनेने पवित्र नदीच्या तीरावर एकत्र येतात.
‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ ‘घडा’ किंवा ‘कलश’ असा होतो. पौराणिक कथेनुसार, सत्ययुगात जेव्हा देव आणि दानवांनी मिळून ‘समुद्रमंथन’ केले, तेव्हा त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातील सर्वात शेवटचे रत्न म्हणजेच ‘अमृत कुंभ’ (अमृताने भरलेला घडा) होते. हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये १२ दिवस आणि १२ रात्री (जे मानवी जगातील १२ वर्षांच्या बरोबरीचे आहे) युद्ध झाले. या ओढाताढीत अमृत कुंभातून अमृताचे काही थेंब पृथ्वीवरील चार पवित्र ठिकाणी पडले..
प्रयागराज (गंगा-यमुना-सरस्वती संगम), हरिद्वार (गंगा), उज्जैन (शिप्रा) आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर (गोदावरी). म्हणून दर १२ वर्षांनी या चार ठिकाणी आलटून-पालटून कुंभमेळा भरवला जातो.
नाशिकच्या कुंभमेळ्याला ‘सिंहस्थ’ म्हटले जाते कारण या काळात गुरु (बृहस्पती) हा सिंह राशीत प्रवेश करतो. नाशिकचा कुंभमेळा दोन वेगवेगळ्या ठिकाणी (नाशिक आणि त्र्यंबकेश्वर) विभागलेला असल्यामुळे त्याला एक आगळीवेगळी आध्यात्मिक लय आहे. येथे शैव (भगवान शिवाची पूजा करणारे) आणि वैष्णव (भगवान विष्णूची पूजा करणारे) पंथांचे साधू वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक विधी पार पाडतात.
कुंभमेळ्याच्या काळात नद्यांमधील पाणी हे सामान्य पाणी नसून ते ‘अमृत’ बनते, अशी हिंदू धर्मीयांची गाढ श्रद्धा आहे. विशिष्ट खगोलीय ग्रहमानात (शाही स्नानाच्या दिवशी) नदीत डुबकी मारल्याने मनुष्याचे सर्व पाप धुतले जातात, त्याला रोगांपासून मुक्ती मिळते आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन ‘मोक्ष’ प्राप्ती होते, असे मानले जाते.
कुंभमेळा हा भारताच्या विविधतेचे आणि एकतेचे जिवंत दर्शन घडवतो. हिमालयाच्या गुहेत राहणारे नागा साधू, तपस्वी, अघोरी आणि संत या निमित्ताने सर्वसामान्यांना दर्शन देतात. युनेस्कोने (UNESCO) कुंभमेळ्याला मानवतेचा ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ (Intangible Cultural Heritage) म्हणून मान्यता दिली आहे. हा मेळा केवळ अंधश्रद्धा नसून मानवाचा निसर्गाशी, नद्यांशी आणि स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा एक अलौकिक सोहळा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा सोहळा होणार आहे.
Ans: गुरू ग्रहाच्या सिंह राशीतील स्थितीशी या कुंभमेळ्याचा संबंध असल्याने त्याला सिंहस्थ कुंभमेळा म्हणतात.
Ans: भाविक गोदावरी स्नान, मंदिरदर्शन, पूजा, जप, दानधर्म आणि पितृतर्पण असे धार्मिक विधी करतात.