फोटो सौजन्य- pinterest
दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने भक्ताला सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात, असे म्हटले जाते.
श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला हेरंबा संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी पूजा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे म्हटले जाते. त्यामुळे गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न होतात. भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात आणि चंद्रोदयानंतरच हा उपवास सोडला जातो.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8.40 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6.35 वाजता होईल. उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थी मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी आहे. ही चतुर्थी तिथी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारकी चतुर्थी देखील म्हटले जाते. यावेळी चंद्रोद्याची वेळ रात्री 8.59 वाजता असेल.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर देव्हारा स्वच्छ करुन घेऊन गंगाजल शिंपडावे. एका स्टुलावर किंवा चौरंगावर लाल कापड पसरवून गणपतीची मूर्ती स्थापित करावी. पूजेदरम्यान गणपती बाप्पाला चंदन, कुंकू, हळद, तांदूळ आणि फुले इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात.
त्यानंतर गणपती बाप्पाजवळ दिवा लावून मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. नंतर गणेश चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर आरती करावी. त्यानंतर रात्री चंद्राला अर्ध्य अर्पण करुन उपवास सोडावा.
अंगारकी चतुर्थीचा अर्थ संस्कृतमध्ये सांगण्यात आलेला आहे. अंगारकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा. पुराणामध्ये अंगारकी चतुर्थीचे महत्त्व अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. अंगारकी चतुर्थी हा मोक्षाचा दिवस मानला जातो. असे देखील मानले जाते की, या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात. अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांतून एकदा येते या दिवशी बुद्धीची देवता असलेल्या भगवान गणेशाची पूजा केल्याने ते प्रसन्न होऊन भक्ताला त्यांचे आशीर्वाद मिळतात, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)