संकष्टी चतुर्थी म्हटली आठवतो तो म्हणजे गणपती बाप्पा. यादिवशी गजाननाची आराधना केली जाते. ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना आहे, संकष्टी चतुर्थीचा अर्थ म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी गणपतीची उपासना करून संकटे दूर करण्यासाठी केलेली उपासना तो दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी.
संकष्टी चतुर्थीची वैशिष्ट्ये:
संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची आराधना केल्यास संकट, अडथळे, रोग, आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रास दूर होतो असं हिंदू धर्मात सांगितलं जातं.संकष्टी चतुर्थीला उपवास करण्याची परंपरा आहे. हे व्रत राखून, दिनाच्या शेवटी संध्याकाळी चतुर्थी गणेशाची पूजा केली जाते आणि मोदक किंवा नैवेद्य अर्पण केला जातो.
संकष्टी चतुर्थीचे गणपती मंत्र: उपासनेत विशेष मंत्र जपले जातात, जसे “ॐ गं गणपतये नमः”, जे संकट निवारणासाठी आणि बुद्धी वृद्धीसाठी प्रभावी मानले जाते.महत्त्व: हे व्रत सर्वसामान्य लोकांसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी साधण्यासाठी उपयुक्त आहे.काही ठिकाणी संकष्टी चतुर्थीला विशेष गणेश पूजन केलं जातं. त्याचबरोबर चतुर्थी व्रताची देखील कथा सांगितली जाते.
कथा अशी आहे की, प्राचीन काळात एका राज्यात एक राजकुमार राहत होता. त्याला सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत होता, मग तो शत्रूंचा हो, आर्थिक अडचणी हो, किंवा आरोग्याशी संबंधित त्रास. तो दुःखी होऊन आपल्या संकटावर उपाय शोधत होता. एके दिवशी त्याला एक तपस्वी साधू भेटले आणि त्यांनी सांगितले की, गणपतीच्या उपासनेने आणि व्रताने सर्व संकट दूर होतात. साधू म्हणाले, “महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी उपासना कर, मोदक अर्पण कर आणि ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप कर.”
राजकुमाराने साधूंचे सांगितले तसे केले. त्याने संकष्टी चतुर्थीला व्रत धरले, संध्याकाळी गणपतीची पूजा केली आणि मोदक अर्पण केले. काही काळानंतर त्याच्या सर्व संकटांची समाप्ती झाली, त्याचे राज्य सुरक्षित झाले आणि तो आनंदाने राज्य करत राहिला. त्यापासून हा दिवस संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जाऊ लागला, अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीबाबात हिंदू पुराणात अनेक वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात त्यातलीच ही एक कथा आहे.
संकष्टी चतुर्थीचे व्रत केवळ संकट दूर करण्यासाठी नाही, आलेल्या संकटांना धीराने सामोरं जाण्यासाठी गणपती बाप्पा जवळ बळ मागणं आहे. गणपती बाप्पा हा बुद्धीची देवता आहे त्यामुळे प्रतिकुल परिस्थित मानसिक भान राखणं आणि योग्य निर्णय घेणं यासाठी बाप्पाकडे आशीर्वाद मागितले जातात. मानसिक शांती साधण्यासाठी आणि जीवनातील अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी लाखो भाविक यादिवशी गणेशाची आराधना करतात. या दिवशी उपवास करून, गणपती स्तुती ऐकतात, मंत्र जपतात आणि नैवेद्य अर्पण करतात. त्यामुळे या व्रताला आध्यात्मिक तसेच मानसिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे.