स्वामी समर्थांनी अक्कलकोट निवासस्थान का निवडलं ?
श्री स्वामी समर्थांना अक्कलकोट निवासी असं म्हटलं जातं. स्वामींनी देशभर भ्रमंती केली अनेकांनी त्यांना आपले गुरु मानले. स्वामींना अवतार घेऊन अनेक वर्ष लोटली तरी आजही भाविक तितक्याच श्रद्धेने स्वामींना मानतात. आज स्वामींचे मठ अनेक ठिकाणी दिसून येतात. मात्र स्वामीचं निवासस्थान अक्कलकोट या तीर्थक्षेत्राचं दर्शन घ्यावं असं प्रत्येक भाविकाला वाटतं. दत्तसंप्रदायात अक्कलकोटला मोठं महत्त्व आहे. पूर्ण विश्वाचे ब्रम्हांडनायक असलेले स्वामींनी आपलं निवासस्थान अक्कलकोटच का निवडलं ते जाणून घेऊयात.
दत्तसंप्रदायातील शिवपुरी अक्कलकोटचे गजानन महाराज यांचे वंशज डॉ. पुरुषोत्तम राजीमवाळे यांनी स्वामींच्या अक्कलकोट निवासाबाबतची माहिती एका मुलाखतीत सांगितली आहे. अक्कलकोटला विद्येचं घर म्हटलं जातं. पुर्वी या ठिकाणाला विद्यानगर असं नाव होतं. त्यानंतर कालांतराने त्याचं नाव प्रय्यानगर झालं. हे शहर सरस्वती नदीच्या तीरावर वसलेलं होतं. हे ठिकाण फक्त एक शहर नाही तर महानगर म्हणून ओळखलं जात होतं. याच महानगरामध्ये दत्तगुरुंनी अनेक अवतार प्रकट केले. तसंच अनेक सिद्धपुरुषांना इथे दिक्षा दिल्याचे दाखले आहेत. असं म्हणतात की, गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर हे तीन ठिकाणं या महानगरापासून जवळ आहेत. या तीन तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणांच्या मध्ये अक्कलकोट आहे.
याच अक्कलकोट मध्ये गुरुमंदिरात आई जगदंबेचं प्रकट स्वरुप असल्याचं म्हटलं जातं. त्याचबरोबर स्वामींच्य़ा आज्ञेने बाळप्पा महाराजांनी मठ सुरु केल्याची माहिती आहे. अक्कलकोटच्या भूमीतून काय़मच विद्येचा प्रचार झाला आहे. याचकारणामुळे स्वामींनी अक्कलकोट हे आपलं निवासस्थान केल्याचं सांगितलं जातं.
सत्कर्म हीच इश्वर सेवा अशी शिकवण स्वामींनी त्यांच्या कार्यकाळात दिली होती. स्वामींनी कधी कर्मकाडांला दुजोरा दिला नाही. खरतरं इश्वरसेवा म्हणजे कायबाबत स्वामी म्हणाले की, तुम्ही केलेलं चांगलं कर्म, सेवाभावाने गरजूंना केलेली मदत आणि स्वत:वर ठेवलेला अढळ विश्वास म्हणजे खरी इश्वरभक्ती आहे.
अक्कलकोट येथे स्वामी समर्थ ज्या जागी वास्तव्य करत असत, तिथे औदुंबर झाडं होती, आणि अनेक भक्तांनी तिथे त्यांना ध्यानस्थ अवस्थेत पाहिलं असल्याचे वर्णन आहे.काही भक्तगाथांमध्ये असं सांगितलं जातं की,स्वामी औदुंबर वृक्षाच्या छायेत शांतपणे ध्यान करत असत, आणि त्यांचं तेज झाडाभोवती जाणवत असे.औदुंबराच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे. त्यामुळे औदुंबर पूजन केल्याने दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो, असा भाविकांचा विश्वास आहे.