
Image
23 October Dinvishesh: भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक दिग्गज गायक, प्रसिद्ध संगीतकार आणि गुणी अभिनेते राम मराठे यांची आज जयंती आहे. त्यांनी पं. मनोहर बर्वे, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खाँ आणि पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज गुरूंकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.मराठी रंगभूमीवरील ‘मंदारमाला’, ‘मदनाची मंजिरी’ यांसारख्या संगीत नाटकांतून आणि आपल्या खणखणीत आवाजातील अजरामर नाट्यगीतांमुळे त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अफाट संगीतसेवेचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘संगीतभूषण’ या किताबाने सन्मानित केले होते, तसेच त्यांना १९८७ मध्ये प्रतिष्ठित ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाला. ते केवळ शास्त्रीय गायक नव्हते तर त्यांना जोड आणि अनवट रागांचे अगाध ज्ञान होते. त्यांच्या गायकीत रागाची शुद्धता आणि लयकारीवर उत्तम पकड होती. त्यांनी आयुष्यभर शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताची सेवा करून मराठी संगीतसृष्टीला समृद्ध केले; त्यांच्या स्मरणार्थ तळेगाव दाभाडे येथे आजही संगीत स्पर्धा घेतली जाते.