bappa on peacock trishunda ganapati temple pune history
Trishund Ganpati Temple Pune : महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून भक्तांच्या हृदयातील एक आस्था आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. दहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात प्रत्येक घरात, प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक चौकात बाप्पाचे स्वागत अगदी जल्लोषात केले जाते. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या आरासीत आणि भक्तिगीतांच्या सुरात हा उत्सव रंगतो. मात्र, या गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील एक अद्वितीय मंदिर भक्तांचे विशेष आकर्षण ठरते. या मंदिरात बाप्पा नेहमीप्रमाणे उंदरावर नव्हे, तर मोरावर स्वार झालेले दिसतात. हे मंदिर म्हणजेच त्रिशुंड गणपती मंदिर.
त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिराचा इतिहास तितकाच विलक्षण आहे जितकी त्यातील मूर्ती. सन १७५४ मध्ये धामपूरचे साधू गिरी गोसावी यांनी या मंदिराच्या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली. तब्बल १६ वर्षांच्या प्रयत्नानंतर, १७७० मध्ये हे मंदिर पूर्ण झाले. सुरुवातीला हे स्थान शिवमंदिर म्हणून ओळखले जात होते, मात्र काळानुसार भक्तीचा प्रवाह बदलत गेला आणि येथे गणपतीची प्रतिष्ठापना झाली. ‘त्रिशुंड’ या नावामागे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. मंदिरातील गणेशमूर्तीला तीन सोंडे, तीन डोळे आणि सहा हात आहेत. अशा प्रकारची मूर्ती अत्यंत दुर्मीळ आहे. सर्वात खास म्हणजे ही मूर्ती मोरावर विराजमान आहे. म्हणूनच या गणपतींना ‘मयुरेश्वर’ असेही म्हटले जाते.
या मंदिरातील गणेशमूर्ती काळ्या दगडातून साकारलेली आहे. मूर्तीवर केलेले कोरीवकाम इतके सूक्ष्म आहे की पाहणारा थक्क होतो. बाप्पाच्या सोंडेतील लाडू, डोळ्यांवरील रत्नजडित कलाकुसर आणि सहा हातांतील आयुधे हे सर्व पाहताना भक्त हरखून जातात. ही मूर्ती मौल्यवान रत्नांनी सजवलेली असून, तिचा दिव्य देखावा भक्तांच्या श्रद्धेला नवा उंचाव देतो. लोकांच्या श्रद्धेनुसार, येथे गणपतीची पूजा केली की नव्या कार्यात यश, अडचणींवर मात आणि सुख-समृद्धी मिळते. त्यामुळे पुणे आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून भाविक येथे येऊन गणपतीच्या चरणी डोके ठेवतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Good Luck Sign: ‘हे’ जीव आहेत आनंदाचे दूत; जर घरात आले तर बदलते नशीब आणि उजळते भाग्य
त्रिशुंड मंदिराचा पुढचा भाग देखील आकर्षणाचा विषय आहे. मंदिराच्या भिंतींवर अद्भुत शिल्पकला आणि कोरीवकाम केलेले आहे. येथे देवी-देवता, पुराणातील कथानकं आणि अनेक पौराणिक पात्रांची शिल्पं दिसतात. ही कलाकुसर पाहताना असे वाटते की जणू दगडांना प्राण मिळाले आहेत. या मंदिराच्या वास्तुशिल्पातून मराठा कालखंडातील कलात्मकतेची झलक दिसून येते. जरी हे मंदिर शहराच्या गजबजाटात लपलेले असले तरी त्याची भव्यता भक्तांना एक अद्वितीय अनुभव देते.
गणेशोत्सवाच्या काळात त्रिशुंड गणपती मंदिराचे रूपच बदलून जाते. रोषणाईने उजळून निघालेल्या मंदिरात भजन, कीर्तन, गजर, ढोलताशा यांचा गडगडाट सुरू असतो. भक्त आपल्या मनोकामना व्यक्त करून बाप्पाच्या चरणी लीन होतात. या पवित्र ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला अंतःकरणातून शांतता लाभते, असा अनेकांचा अनुभव आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : विज्ञानाचा अद्भुत चमत्कार! लाल नाही तर निळे रक्त असलेले ‘हे’ जलचर अत्यंत दुर्मिळ आणि महागडे
पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, परंपरा आणि कलात्मकतेचे अनोखे दालन आहे. मोरावर विराजमान गणपतीचे हे स्वरूप पाहून भक्तांच्या मनात एक वेगळीच आनंदलहरी उमटतात. गणेशोत्सवात जर तुम्ही पुण्यात असाल, तर हे मंदिर पाहणे हा खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.