Good Luck Sign: 'हे' जीव आहेत आनंदाचे दूत; जर घरात आले तर बदलते नशीब आणि उजळते भाग्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Good Luck Sign : भारतीय संस्कृतीत आणि हिंदू शास्त्रांमध्ये निसर्गातील प्रत्येक घटकाला काही ना काही अर्थ जोडलेला आहे. फुले, वृक्ष, नदी, वारा, तसेच प्राणी आणि पक्षी हे सर्व केवळ पर्यावरणाचा भाग नाहीत, तर शुभ-अशुभ संकेतांचे दूत मानले गेले आहेत. वास्तुशास्त्र, शकुनशास्त्र आणि प्राचीन ग्रंथांमध्ये काही विशिष्ट प्राणी घरात आले तर ते समृद्धी, सौख्य, धन आणि समाधानाचे सूचक मानले जातात. आज आपण अशाच काही शुभ संकेत देणाऱ्या प्राण्यांविषयी जाणून घेऊया.
घरात अचानक एखादे फुलपाखरू येणे हा खूप चांगला संकेत मानला जातो. शकुनशास्त्रानुसार, फुलपाखराला सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि नवीन संधींचे प्रतीक मानले जाते. विशेषतः जर फुलपाखरू पूजाघरात येऊन बसले, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. फुलपाखराचे घरात आगमन म्हणजे घरात आनंद, चैतन्य आणि शुभवार्ता येणार आहेत असा संकेत मिळतो.
हे देखील वाचा : World Letter Writing Day 2025 : संवादाची हरवलेली पण अजूनही जिवंत असलेली कला म्हणजे हस्तलिखित पत्र
सामान्यतः घरात बेडूक आला की लोक घाबरतात किंवा त्याला अशुभ मानतात. पण प्रत्यक्षात फेंगशुई आणि ज्योतिषशास्त्रात बेडूक हा संपत्ती व सौख्य वाढवणारा प्राणी मानला गेला आहे. घरात बेडकाचे आगमन हे पैशाचा ओघ वाढण्याचे आणि कर्जसंकट दूर होण्याचे चिन्ह मानले जाते. म्हणूनच, जर कधी तुमच्या अंगणात किंवा घरात बेडूक आला, तर तो खरं तर भाग्याचा संदेश घेऊन आला आहे.
भारतीयच नव्हे तर चिनी संस्कृतीतदेखील कासवाला अतिशय शुभ मानले गेले आहे. घरात किंवा अंगणात कासव दिसणे म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होणे. याशिवाय, कासव हे समृद्धी, पैशाचा ओघ आणि कुटुंबातील स्थैर्याचे द्योतक आहे. विशेषतः जर अचानक कुठूनतरी घरात कासव आले, तर घरातील अडचणी दूर होऊन स्थिरता आणि प्रगती साध्य होते असे मानले जाते.
हिंदू शास्त्रांनुसार पोपट हा धनदेवता कुबेराशी संबंधित आहे. घरात पोपट आला तर तो शुभ संकेत मानला जातो. विशेषतः जर घरात बोलणारा पोपट आला, तर तो घरात संपत्ती वाढवतो, व्यवसायात लाभ मिळवून देतो आणि कुटुंबातील आनंद वाढवतो. पोपटाचे घरात आगमन हे नुसते शुभच नव्हे, तर संपत्ती आणि यशाचे दार उघडण्याचे संकेत आहे.
चिमणी हा पक्षी भारतीय संस्कृतीत नेहमीच विशेष मानला गेला आहे. घरात चिमणी येणे किंवा घराच्या छतावर घरटे बांधणे हे संपत्तीची स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य सुनिश्चित करणारे मानले जाते. चिमणीचे घरात घरटे बांधणे म्हणजे त्या घरात निरंतर सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती राहणार असा विश्वास आहे.
प्रकृती ही स्वतःमध्येच एक गूढ संदेश घेऊन येते. प्रत्येक प्राणी, पक्षी आणि कीटक यांचा शक्ती आणि उर्जेशी खोल संबंध असतो. फुलपाखरू आनंद घेऊन येते, बेडूक धनाचा ओघ वाढवतो, कासव स्थिरता देते, पोपट संपत्तीशी जोडलेला आहे आणि चिमणी घराचे सौख्य वाढवते. म्हणूनच, या प्राण्यांचे घरात आगमन हे केवळ योगायोग नाही तर समृद्धीचे लक्षण आणि देवतेचा आशीर्वाद मानले गेले आहे.
हे देखील वाचा : उत्तरप्रदेशमधील ‘हे’ प्रसिद्ध गणेश मंदिर जिथे प्रेमाला मिळतो दैवी आशीर्वाद; अविवाहितांनाही मिळते लग्नाची हमी
जर हे प्राणी तुमच्या घरात आले तर ते घाबरण्याचे कारण नाही, उलट हा तुमच्यासाठी आनंदाचा संदेश आहे. शास्त्र आणि परंपरा दोन्हीही सांगतात की हे प्राणी घरात आले तर ते शुभेच्छा, समृद्धी आणि सौख्य घेऊन येतात. म्हणूनच पुढच्या वेळेस जर एखादे फुलपाखरू, पोपट, चिमणी किंवा कासव तुमच्या घरात आले तर त्यांचे स्वागत करा, कारण ते तुमच्या आयुष्यात आनंदाचे दूत बनून आले आहेत.